

महाड : यावर्षी पावसाने एक महिना अगोदर सुरुवात करून देखील जुलैचा शेवटच्या आठवड्यात अवघ्या 1430 मी मी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी 23 जुलै अखेर 2078 मी मी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे महिनाभर अगोदर सुरुवात करूनही आज अखेर 600 मी मी कमी पाऊस झाला आहे. गेल्या 5 ते 10 वर्षाचा इतिहास पाहिला तर महाड तालुक्यात दरवर्षी 3500 ते 4000 मी मी सरासरी पावसाची नोंद होत असते. त्यामुळे उर्वरित 2000 ते 2500 मीमी पाऊस येणार्या दोन महिन्यात पडण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यापासून हिंदुंचे सण उत्सव सुरु होत असतात. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जर उर्वरित सरासरी पाऊस पडला. या सणासुदीच्या काळात व्यापारी वर्ग आपल्या दुकानातून लागणारा सामानसुमान मोठ्या प्रमाणात भरून ठेवत असतात. दरवर्षी साधारण जुलै महिन्यात पुराची शक्यता असल्याने महाडचा व्यापारी वर्ग आपल्या दुकानातून लागेल तेवढाच जिन्नस ठेवत असतो मात्र यावर्षी जुलै महिना संपला तरीही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने पुढील दोन महिने पाऊस काय करणार अशी चिंता व्यापारी वर्गाला सतावू लागली आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होत आहे. या उत्सवात महाड बाजार पेठेत करोडोची उलाढाल होत असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात जर पावसाने जोर पकडला तर त्याचा परिणाम महाडमधील व्यापार्यांच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. याउलट जर पुढील दोन महिन्यात पावसाचा जोर कमी राहीला तर दरवर्षीची सरासरी गाठली जाणार नाही आणि त्याचा परिणाम पुढील वर्षी पाण्याच्या टंचाईवर होईल अशी भिती व्यक्त होत आहे.
दरवर्षी साधारणत: जुलै महिन्यात पुराची शक्यता असल्याने महाडचा व्यापारी वर्ग आपल्या दुकानातून लागेल तेवढाच जिन्नस ठेवत असतो, मात्र यावर्षी जुलै महिना संपला तरीही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने पुढील दोन महिने पाऊस काय करणार अशी चिंता व्यापारी वर्गाला सतावू लागली आहे.