

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील चांढवे बुद्रुक गावच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अशोक महादेव राऊत (वय ७९) असे मृताचे नाव आहे. दहिसर, मुंबई येथील राऊत कुटुंबीयांच्या कार व कंटेनर यांचा भीषण अपघात झाला. राऊत कुटुंबातील अन्य काही सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेल कृष्णा समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला स्विफ्ट डिझायर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदरपाडा, दहिसर येथील राऊत कुटुंबीय सकाळी कणकवली येथून मुंबईकडे MH 47 AG 4836 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने निघाले होते. सायंकाळच्या सुमारास चांढवे बुद्रुक टोलनाक्याजवळ हॉटेल कृष्णा समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.
या अपघातात अशोक महादेव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीतून सौ. गीतांजली सुमित राऊत (वय ३६), सुमित अशोक राऊत (वय ४१), सीमा अशोक राऊत (वय ७६), अमित अशोक राऊत (वय ४९) तसेच अंगत सुमित राऊत (वय ७) हे देखील प्रवास करीत होते त्यांच्यापैकी काही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महाड एमआयडीसी पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.