

महाड: रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीत (MIDC) पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (NCB) संयुक्त पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. एका बंद रासायनिक कंपनीच्या आवारात छापा टाकून पथकाने तब्बल ८८.९२ कोटी रुपये किमतीचा किटामाईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईने औद्योगिक परिसरात चालणाऱ्या बेकायदेशीर अमली पदार्थांच्या निर्मितीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
पोलीस आणि एनसीबीला महाड एमआयडीसीतील एका बंद कंपनीत बेकायदेशीरपणे रासायनिक प्रक्रिया करून अमली पदार्थ तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, दोन्ही यंत्रणांच्या संयुक्त पथकाने बुधवारी (दि.२३) रात्री या युनिटवर छापा टाकला. या कारवाईत पथकाला मोठे यश मिळाले. यामध्ये पोलिसांनी ३४ किलोग्रॅम किटामाईन पावडर, १३ किलोग्रॅम लिक्विड किटामाईन अशी एकूण ८८.९२ कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या रासायनिक युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनांच्या नावाखाली केवळ अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी केला जात होता. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या रॅकेटची पाळेमुळे खोलवर रुजली असून, यात आणखी काही लहान रासायनिक युनिट्सचा समावेश असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीवर केलेला मोठा प्रहार मानला जात असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे ध्येय तपास यंत्रणांनी ठेवले आहे.