

महाड : प्रतिवर्षी पावसाळ्यामध्ये महाड औद्योगिक वसाहती मधील काही कारखानदारांकडून मुसळधार पावसाचा फायदा घेत रात्री उशिरा प्रदूषित मिश्रित रसायन नदीपात्रात सोडल्या जाण्याच्या घटना आता पुन्हा एकदा समोर येत आहे. शनिवारी सकाळी टेमघर नाल्यामध्ये सफेद रंगाचे निर्माण झालेले पाणी व काल रात्री व आज सकाळी खाडी पट्ट्यातील सव या गावाजवळ नदीपात्रात प्रदूषित रंगीत पाणी तयार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. याची गंभीर दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित ठिकाणचे पाण्याची नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.
महाड वसाहती मधील टेमघर नाला येथे झालेल्या सकाळच्या या प्रदूषित नाल्या संदर्भातील घटनेबाबत महाड प्रदूषण यंत्र मंडळाचे मुख्य अधिकारी तानाजी पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात आपल्याकडे सकाळी 11 च्या तक्रार प्राप्त झाल्याचे सांगीतले. आज कार्यालय बंद असल्याने कर्मचार्यांना या संदर्भात तातडीने आपण पाण्याचे नमुने घेण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिले.
खाडीपट्टा विभागातील सव या गावाच्या परिसरात देखील काही नागरिकांनी प्रदूषित मिश्रित पाणी गेल्या दोन दिवसापासून या परिसरात दिसून येत असल्याच्या तक्रारी केल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आली होती . त्याबाबतही संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याबाबतची खातर जमा केली असून नमुने गोळा करण्यात आल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.
काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीच्या होत असलेल्या घटनांच्या विरोधात खाडीपट्टा संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. मागील काही वर्षात सर्व सुरळीत झाल्याने संघर्ष समितीची कामे थांबली होती. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या या घटना लक्षात घेता खाडीपट्टा संघर्ष समिती या संदर्भात कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्थानिक प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ याबरोबरच महाड औद्योगिक वसाहती मधील सीईटीपी या यंत्रणेकडून देखील या संदर्भात विशेष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून तसेच कामगार वर्गातून केले जात आहे.याबाबत काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
सावित्री प्रदूषित करण्याचा प्रकार
चालू वर्षी पावसाळ्यामध्ये होणार्या या घटनांमध्ये तुलनेने घट झाली असली तरीही आता पावसाळी हंगाम संपत असताना सुरू झालेल्या या घटनांनी स्थानिक ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा या सावित्री नदीला प्रदूषित करणार्या कारखानदारांविरोधात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.