

महाड : महाड तालुक्यातील सहापैकी पाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांना इंधनपुरवठा करण्याकरिता तांत्रिक अडचणी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी वरंध, बिरवाडी, पाचाड, विन्हेरे, चिंभावे या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेला इंधन नसल्यामुळे आरोग्य विभाग रुग्णसेवा देण्यास अडचणी येत आहेत. अपघातग्रस्त, सर्पदंश, विंचूदंश, गरोदरमाता अशा रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. अशातच आरोग्य विभागाला शासनाने वाऱ्यावर सोडल आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
याबाबत तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर बिराजदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत तांत्रिक अडचणींची माहिती देऊन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदे कडे याबाबतची अत्यावश्यक असलेली मंजुरी देण्याचे प्रस्ताव सादर केल्याचे स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नव्याने नियुक्ती करण्यात आली नसून प्रभारी कारभार सोपविण्यात आला आहे. महाड तालुक्यातीलपाचही आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्यामुळे तसेच वरिष्ठ कार्यालय रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पद कार्यभार आदेश न केल्यामुळे रुग्णवाहिकेला इंधनाचा तुटवडा झाल्याचे समजते.