महाड : गावकीच्या मीटिंगमध्ये गोंधळ घालत ग्रामस्थांना शिवीगाळ करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार हत्याराने एकास जखमी केल्याची घटना शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास महाड तालुक्यातील पिंपळवाडी वांद्रेकोंड येथे घडली आहे. या घटनेबाबत सखाराम गोविंद दिघे राहणार पिंपळवाडी वांद्रेकोंड यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी एकूण 12 ते 13 आरोपींविरोधात कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील दत्त मंदिराच्या बांधकाम संदर्भात गावकीची मीटिंग सुरू असताना अंकुश गोपाळ पवार यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून काही ग्रामस्थ उभे राहिले असता आरोपी अंकुशच्या सोबतच्या 10 ते 12 जणांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेले.
धावून गेलेल्यातील आरोपी लक्ष्मण रामचंद्र शेडगे यांनी त्यांच्यासोबत आणलेली मिरचीपूड ग्रामस्थांवर टाकली ती पूड फिर्यादीसह रामचंद्र वांद्रे,संतोष वांद्रे व इतर ग्रामस्थांच्या डोळ्यात गेल्यानंतर आरोपी संजय रामचंद्र शेडगे व अशोक नारायण पवार यांनी आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने प्रवीण सिताराम शेडगे यांच्यावर वार केल्याने त्यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कारवाई करत संजय रामचंद्र शेडगे, अंकुश गोपाळ पवार, अशोक नारायण पवार, लक्ष्मण रामचंद्र शेडगे,भरत मोतीराम वांद्रे, रमेश शिवराम पवार, राजू धोंडीराम पवार,सुमित उर्फ बाबू शिवराम पवार,कल्पेश बाबू पांगारे यांसह अन्य 4 ते 5 जण सर्व राहणार वांद्रे कोंड तालुका महाड जिल्हा रायगड यांच्या प्रमाणे गुन्हा दाखल केला आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.