

महाड : महाड शहरात दुपारपासून सायंकाळी सात नंतर पर्यंत सुरू असलेल्या नामदार भरत शेठ गोगावले मित्र मंडळ व राष्ट्रवादी दहीहंडी उत्सवात प्रत्येकी 80 पेक्षा जास्त मंडळांनी सहभाग घेतला.सारे शहर गोविंदामय झाले होते.
माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या मांदाड येथील गोविंदा पथकाने तसेच खेडचे माजी आमदार संजय कदम यांच्या गोविंदा पथकाने आठ थर लावून एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक जिंकले. सर्व गोविंदा पथकांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्वागत करून दहीहंडी हा उत्सव मराठी माणसाचा संघटित व कौशल्य दाखवणारा सण असल्याचे मत व्यक्त केले.
गोगावले मित्र मंडळाच्या दहीहंडीत दोन गोविंदा पथकांनी आठ थर लावले त्यानंतर वीस गोविंदा पथकाने सात थर लावून प्रत्येकी 25 हजार,चोवीस गोविंदा पथकांनी सहा थर लावून 12 हजार,20 पथकांनी पाच थर लावून 7 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. महिलांच्या गटात पाच संघाने पाच थर लावून 12 हजार तर बारा संघानी चार थर लावून 7हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. राष्ट्रवादीच्या दहीहंडीला मंत्री अदिती तटकरे यांनी भेट देऊन गोविंदा पथकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवामध्ये बिरवाडीच्या गोविंदा पथक व कोटेश्वरी तळे गोविंदा पथकाने 7 थर लावले. राष्ट्रवादी दहीहंडी उत्सवामध्ये 80 गोविंदा पथके सहभागी झाली. नऊ गोविंदा पथकांनी सात थर, 22 पथकांनी सहा थर, 18 पथकांनी पाच थर तर महिलांच्या गोविंदा पथकांपैकी चार पथकांनी पाच व नऊ पथकांनी चार थर लावले.
ना.भरतशेठ गोगावले यांनी धरला ठेका
मंत्री भरत शेठ गोगावले यांनी माणगाव येथील गोविंदा पथकाने आठ थर लावल्यानंतर या पथकाचे प्रमुख माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या समवेत खालुबाजावर ठेका धरून आपला आनंद साजरा केला.