

महाड : पुढारी वृत्तसेवा
मागील दोन दिवसांत महाडच्या राजकारणात झालेला मोठा बदल म्हणून स्नेहल जगताप व नाना जगताप यांचा राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशा संदर्भात नामदार भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सध्याचे राज्यातील राजकारण हे बेभरवशाचे व नीतिमत्ता नसलेले झाले आहे.
स्वर्गीय माणिकराव जगताप यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्याय संदर्भात सोशल मीडियावर व्यक्त होणारा त्यांचा व्हिडिओ व त्यांची मते या पार्श्वभूमीवर त्यांच्या नातलगांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणे हे दुर्दैवी असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
विधानसभेतील झालेल्या पराभवानंतर केवळ चार महिन्यात त्यांनी घेतलेला हा निर्णय अचंबित करणारा असून, त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी शिवसेना संघटनेचे सर्व कार्यकर्ते अधिक मजबुतीने यासाठी मुकाबला करायला सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी चौथ्यांदा विजय होत असताना देखील आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात होते, मात्र त्यावर मात करून आपण येणाऱ्या पाचव्या टर्मसाठी तयारी सुरू केल्याचे हे स्पष्ट केले व स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत आपण प्रवेशानंतरच अधिक स्पष्टपणे प्रतिक्रिया व्यक्त करू असे पुढारीशी बोलताना सांगितले.