

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
गेली तीन दशकांपूर्वी मोठ्या प्रमाणात असलेले पशुधन सद्यस्थितीला मोठी घट झाली असून पशुधन वाचवणे शेतकऱ्यांची मोठी तारेवरची कसरत झाली आहे. विविध आजारपणात खर्चाचा मोठा भार सोसावा लागत आहे. त्याचबरोबर आजारपणात वेळेला उपचार मिळावा म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याची मोठी समस्या महाडच्या खाडीपट्टयामध्ये भेडसावत असून त्यामुळे येथील शेतकरी राजाची पशुधन वाचवण्यासाठी चाललेल्या धडपडीला अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.
विकसित तंत्रज्ञानाने घेतलेली गरुड भरारी झेप दिवसेंदिवस परिवर्तनाची मोठी सीमा गाठत चालली आहे. शेतीमधील अवजारांमध्ये मोठ्या प्रमाणात नवनवीन संशोधन समोर आले असून विविध इंधनांवरील अवजारांमुळे पशुधनाची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. साधारणपणे तीन दशकांपूर्वी शेतीमधील साहित्याची ने-आण करणे त्याचबरोबर गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात साहित्याला दळणवळण व्यवस्थेला बैलगाडीचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता, तो देखील सध्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे संपुष्टात आला आहे. नांगरणीसाठी लागणारी बैल जोडी आणि नांगराची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे.
दिवसेंदिवस पशुधनाची कमतरता जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढते शहरीकरण. शेतीत यांत्रिकीकरण, तरुणांचा नोकरी-व्यवसायांसाठी शहराकडे वाढलेला कल, चराऊ कुरणांची घट आणि हवामानातील बदलामुळे चाऱ्याची टंचाई आहे आणि वारंवार नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतीच नामशेष होण्याच्या मार्गावर असून हजारो एकर शेती आता ओसाड पडलेली आहे. ज्यामुळे शेतकरी पशुपालनापासून दूर जात आहेत. शेतीमधील वाढते ट्रॅक्टर, नांगर आदी साहित्याने यांत्रिकीकरण यामुळे बैलांची गरज कमी झाली आहे.
तरुण पिढीसह येथील स्थानिक नागरिक नोकरीच्या शोधात तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शहरांकडे वळत असल्याने पशुपालनातून पाठ फिरवत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वारंवार नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी शेती सोडत आहेत. पर्यायाने पशुधन हळूहळू कमी होऊ लागले आहे. खाडीपट्टयात खूपच कमी प्रमाणात बैलगाडी वापरली जात आहे, तर नांगरणीसाठी बैल जोडी देखील मिळेनाशी झाली आहे.
आजच्या स्थितीला गुरांचे गोठे सुध्दा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. हवामान बदलांमुळे कधी उष्णतेचे वाढणारे प्रमाण जनावरांचे आरोग्य बिघडते आणि उत्पादनात त्याचे घट होते, ज्यामुळे पशुपालक पशु जगवण्यात निराश आहेत. पशुपालनासाठी लागणारा खर्च आणि त्यातून मिळणारा तुटपुंजा नफा यामुळे पशुपालक जनावरे विकून इतर व्यवसायाकडे अथवा नोकरीकडे वळले आहेत.
तात्काळ वैद्यकीय उपचारांचा अभाव
असलेले पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची चाललेली धडपड पाहता पशुधनाला इजा पोचल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून पशुधनाला इजा पोचल्यानंतर तात्काळ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार मिळावा ही माफक अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.