Leptospirosis | रायगड जिल्ह्यात २ वर्षात लेप्टोस्पायरोसिसने १५ जणांचा मृत्यू

कशामुळे होतो हा आजार, काय काळजी घ्याल?
Leptospirosis
रायगडात लेप्टोचे अडीच वर्षात 15 मृत्यू, सद्यस्थितीत 168 बाधित File Photo
अलिबाग शहर : अमूलकुमार जैन

लेप्टोस्पायरोसिसचा सर्वसामान्यतः हा आजार म्हणजे एक सौम्य संसर्ग असतो. गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतो किंवा काही दुर्मीळ केसेसमध्ये रुग्णाचा मृत्यू देखील ओढवू शकतो. रायगड जिल्ह्यात जानेवारी 2022 ते जून 2024 पर्यंत 168 रुग्ण सापडले असून त्यापैकी 15 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण, श्रीवर्धन, पोलादपूर वगळता इतर तालुक्यात या लेप्टोस्पायरोसिस आजाराचे रुग्ण सापडले असून अलिबाग, मुरुड, पेण, सुधागड, रोहा आणि तळा तालुक्यात रुग्ण दगवलेले आहेत.

Summary

आजाराची प्रमुख कारणे काय

  • लेप्टोस्पायरोसिस हा आजार जिवाणूमुळे होतो.

  • व्यक्तीच्या तोंडातून, नाकातून, डोळ्यातून किंवा त्वचेच्या फोडातून जिवाणू शरीरात प्रवेश करतात.

  • दूषित पाण्यात पोहणे, अस्वच्छ भागात राहणे ही कारणे आहेत.

रस्त्यावरील खड्डे, मोकळे भूखंड, तसेच सखल भागात पाणी साचत असते. दूषित पाण्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस या जिवाणूजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात स्वच्छता पाळावी, पाणी साचू देऊ नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दूषित पाणी व मातीशी नागरिकांनी संपर्क टाळावा. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवावा, वैयक्तिक स्वच्छता टिकवून पावसाळ्यात घरासभोवताली जीवजंतूंची निर्मिती होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

जनावरांना होणारा ‘लेप्टोस्पायरोसीस’ आता माणसांना

जनावरांना होणारा ‘लेप्टोस्पायरोसीस’ हा आजार आता माणसांनाही होताना दिसून येत आहे. रायगड जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.लेप्टोस्पायरोसिस हा संसर्ग असून तो लेप्टोस्पायरा या एक प्रकारच्या जंतूमुळे होतो. हा संसर्ग मनुष्य आणि उंदीर, कुत्रे, गाय यासारख्या प्राण्यांनादेखील होऊ शकतो.लेप्टोस्पायरा जंतूने दूषित स्रोताशी एखाद्या व्यक्तीचा संपर्क आल्यापासून ती व्यक्ती आजारी पडेपर्यंतचा कालावधी दोन दिवसांपासून चार आठवड्यांपर्यंतचा असू शकतो. माणसांमध्ये लेप्टोस्पायरोसिसची अनेक लक्षणे दिसून येतात. खूप ताप येणे, थंडी वाजणे, पुरळ येणे, डोकेदुखी, सांधेदुखी अशी सौम्य लक्षणे दिसून येऊ शकतात. काहीवेळा पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार असे देखील त्रास होऊ शकतात. पावसाळ्यात होणार्‍या इतर अनेक आजारांची देखील हीच लक्षणे असतात. त्यामुळे काही वेळा रुग्णाकडून वैद्यकीय मदत घेण्यात देखील उशीर केला जाऊ शकतो. बर्‍याचदा संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात सौम्य लक्षणे दिसून येतात. त्यानंतर त्या व्यक्तीची सर्व लक्षणे निघून जातात आणि दुसर्‍या टप्प्यात किडनी व यकृत यांच्यावर परिणाम करणारी अतिशय गंभीर लक्षणे दिसून येऊ लागतात.

पावसाळ्याच्या साचलेल्या पाण्यात वावरणे टाळावे, इतर वेळेस पाण्यात उतरताना वाटरप्रूफ ड्रेसिंग प्रतिबंधात्मक ठरते.कावीळ, मोठ्या प्रमाणावर रक्तस्रावामुळे डोळे लाल होणे आणि त्यानंतर किडनी, यकृत निकामी होणे किंवा मेंदूज्वर असे आजारदेखील होऊ शकतात.दरम्यान, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या आजाराचे रुग्ण आढळत नसल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत.

काय काळजी घ्याल?

पाण्याच्या साचलेल्या डबक्यात जाऊ नये, दूषित पाणी, माती किवा भाज्यांचे मानवी संपर्क टाळावे, यासाठी हातमोजे वापरता येतील. मुत्रामुळे पाण्याचे साठे दूषित होऊ देऊ नयेत, साचलेल्या पाण्यामधून जर चालत गेल्यास घरी पोहचल्या- बरोबर पाय स्वच्छ पाण्याने तसेच साबनाने स्वच्छ करावे.

पायाला जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे, तसेच गमबूटचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय स्वच्छ धुवावे जर जखम असेल, तर त्या व्यक्तीने तातडीने उपाययोजना करावी. साचलेल्या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतोवर साचलेल्या पाण्यातून चालू नये, तसेच काही लक्षणे दिसल्यास वेळीच निदान करणे गरजेचे आहे.

डॉ. मनिषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.

लेप्टोस्पायरोसिस रुग्ण संख्या

(जानेवारी 2022ते जून 2024)

तालुका | बाधित संख्या | बाधित मृत्यू |

------- | -------- | -------- |

अलिबाग | 74 | 5 |

कर्जत | 1 | 1 |

खालापूर | 5 | 0 |

महाड | 1 | 0 |

माणगाव | 0 | 0 |

म्हसळा | 1 | 0 |

मुरुड | 9 | 3 |

पनवेल | 0 | 0 |

पेण | 23 | 2 |

पोलादपूर | 0 | 0 |

रोहा | 29 | 3 |

श्रीवर्धन | 0 | 0 |

सुधागड | 4 | 1 |

तळा | 1 | 1 |

उरण | 0 | 0 |

एकूण | 168 | 15 |

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news