

जयंत धुळप
रायगड : महाराष्ट्रामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी आणि जखमी होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. 2024 मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 20 जणांचा, तर 2025 मध्ये आतापर्यंत तब्बल 68 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच गतवर्षीच्य तुलनेत 2025 मध्ये 66 मृत्यू अधिक झाले आहेत. हल्ल्याच्या घटनांमुळे बिबट्याच्या मानवी वस्तीतील घुसखोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 2024 डिसेंबर 2025 पर्यंत अशा दोन वर्षांच्या कळात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकूण 88 जणांचा मृत्यू झाला आहे. सन 2022 मध्ये राज्यात बिबट्यांची संख्या 1 हजार 995 होती ती आता जवळपास दुप्पट म्हणजे 3 हजारांच्या वर पोहोचला असल्याची माहिती वन विभागाची आहे. विविध विकास प्रकल्प, जंगलांतील मानवाचा वाढता हस्तक्षेप अशा विविध कारणांस्तव वनक्षेत्र कमी होत असून, बिबटे ऊस शेतीसह मानवी वस्त्यांजवळील भागात आश्रय घेत असल्याचे दिसून आले आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जंगलांमध्ये कमी होत असलेल्या भक्षामुळे बिबटे मानवी लोकवस्तीतील कुत्रे, गाय, म्हैस अशा पाळीव प्राण्याना आपले भक्ष बनवू लागले असून या दरम्यान त्यांच्या आड येणार्या माणसांवर देखील ते हल्ले करू लागले आहेत.
बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव
बिबट्यांचे हल्ले रोखण्याकरिता मंगळवारी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना उपाययोजना सूचवल्या आहेत. पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. बिबट्या हा प्राणी केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल एक मध्ये असल्याने कार्यवाही करण्यात मर्यादा आहेत. त्यामुळे बिबट्याचा समावेश शेड्यूल एक मधून शेड्यूल दोन मध्ये करण्याची विनंती केंद्र शासनाकडे केली आहे. त्याबरोबर केंद्रीय वन विभागाने राज्यातील पाच बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी दिली असून, याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. सहा महिन्यांत त्याचा अहवाल आल्यानंतर आणखी बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे मंत्री नाईक यांनी सांगिले.
बिबट्यांना पकडालयाला 1200 पिंजरे
पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे बिबट्यांसाठी बचाव केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याची क्षमता वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय अहिल्यानगरमध्येही बचाव केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात 1200 पिंजरे देण्यात आले असून, नाशिक व अहिल्यानगरमध्येही पिंजरे देण्यात आले आहेत. भविष्यात आणखी पिंजरे वाढविण्यात येतील. तसेच लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यास तातडीने पिंजरे पुरविण्याच्या सूचना विभागास देण्यात आल्या आहेत.
एआयच्या माध्यमातूनही बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष
बिबट्यांवर लक्ष ठेवून त्यांच्या हालचालींची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यात आली आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरातील शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी गृह, वन व महसूल विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक तरुणांना सहभागी करून घेण्याचा विचार करण्यात येत आहे.
येथे झाले मानवांवर हल्ले
2025 मध्ये अलिबाग जवळच्या नागाव गावात बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले.
नागपूर शहराच्या निवासी भागात बिबट्याच्या हल्ल्यात 7 जखमी झाले.
पुणे जिल्ह्यात एका 13 वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू.
पुणे जिल्ह्यात 2025 मध्ये आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात चार मृत्यू.