

Alibag two youths injured leopard attack
रायगड : अलिबागजवळील नागाव येथील वाळंज पाडा परिसरात मंगळवारी (दि.९) सकाळी सात वाजता भरवस्तीत एका बिबट्याने दोन तरुणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. अमित वर्तक आणि प्रसाद सुतार अशी जखमी तरुणांची नावे आहेत.
अमित वर्तक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर प्रसाद सुतार किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची कपडे बिबट्याने फाडल्याची माहिती नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी दिली.
या घटनेनंतर तातडीने पुणे आणि रोहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू पथकांनी नागाव येथे धाव घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला आहे. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिसरात दक्षता वाढवली आहे. दरम्यान, नागावमधील सर्व शाळेतील मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.
सरपंच हर्षदा मयेकर यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, बिबट्याला पकडण्यात येईपर्यंत सर्वांनी घरातच सुरक्षित राहावे आणि अनावश्यक बाहेर पडू नये. त्या म्हणाल्या, “नागाव परिसरात बिबट्याचा वावर स्पष्ट झाला आहे. त्याने दोन नागरिकांवर हल्ला केला असून वनविभागाचे पथक त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.”