

आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. हा घाटरस्ता म्हणजे एक वळणदार पायवाट जी आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपून आहे. कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात आता गाड्यांची वर्दळ देखील बरीच वाढली आहे. मात्र या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात आहे.
घाटात पावसाळ्यात कोसळणार्या दरडींचे ग्रहण या घाटाला लागले आहे. पावसात अनेक ठिकाणी दरडींखाली आल्याने व रस्ता रुंदीकरण दरम्यान डोंगर भाग कटींग केल्याने माती खालीआली असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सदरचा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने या मार्गवरील हॉटेल व्यवसाय ठप्प होणार असून पर्यटन सुद्धा परिणाम होणार आहे.
सह्याद्रीच्या डोंगरात नागमोडी वळणाचा आणि उंच चढत जाणारा रस्ता. नजर ठरत नाही अशा खोल दर्या म्हणजे पोलादपूर तालुक्यातून महाबळेश्वर राज्य मार्गावरील आडगावापासून सुरू होणारा आंबेनळी घाट. या घाटाला पावसाळ्यात कोसळणार्या दरडींचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महाड विभागाला अद्याप सुटलेले नाही.
पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे. हा घाट दूर्गम व अवघड असल्याने येथून मालवाहतूक कठीण होती. सातारा, वाईशी कमी अंतरात पोहोचण्याचा हा मार्ग बिकट तर होताच पण या मार्गाची डागडुजी, देखभाल दुरूस्ती करण्यासाठी खुपच खर्च झाला. तरीही ब्रिटीशांना घोडागाडी अथवा मोटार गाडीसाठी उपयुक्त मार्ग तयार करण्याची आवश्यकता भासू लागल्याने पार घाटाच्या उत्तरेस 0.81 कि.मी. अंतरावर कापडे खुर्द गावाजवळ नव्याने घाट बांधला.
या घाटाला फिटझगेराल्ड म्हणत. हाच सध्याचा आंबेनळी घाट होय. या घाटाच्या उभारणीस 1871 साली सुरूवात होऊन केवळ 4 लक्ष 44 हजार रुपये खर्च झाला. हा घाट पाचच वर्षात वाहतुकीस खुला होऊन 1876 सालापासून ब्रिटीश आणि व्यापारी घोडयाला लगाम न लावता कापडे खुर्दपर्यंत उतरत असत. घाट उभारणीच्या काळातच श्रीक्षेत्र महाबळेश्वरचा गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटीशांनी विकास केला.
पोलादपूर येथे मुंबई ते पणजी राष्ट्रीय महामार्ग क्र.17 वर शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती अश्वारूढपुतळया पासून मुंबईहून येणार्या प्रवासी व पर्यटकांना राष्ट्रीय महामार्ग कोकणात तर दुसरा राज्यमार्ग महाबळेश्वर, वाई, सातार्यापर्यंत घेऊन जातो. महाबळेश्वर गिरिस्थान थंड हवेचे ठिकाण पाहण्यास जाणार्या पर्यटकांची घाटात मोठी गर्दी होते.
अवजड वाहतूक सह पोलादपूर बाजूकडून एसटी वाहतूक या मार्गवर बंद असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे अक्कलकोट, तुळजापूर मिरज सांगली कोल्हापूर साताराकडे जाणार्या एसटी महाड पोलादपूर कडून येत नसल्याने हॉटेल व्यवसायला फटका बसला आहे.
हॉटेल व्यवसायिक, वाडा कुंभरोशी
पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरुर राज्य मार्ग एसटी वाहतूक बंद असल्याने सातारा किंवा इतर ठिकाणी जाण्यास लांबचा प्रवास करावा लागत आहे. प्रशासन रस्ता बंद राहणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.
नुराली एस मुजावर, कोल्हापूर प्रवासी