

Ashtami bridge underwater
रोहे : महादेव सरसंबे
कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर अष्टमी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. गेले ३५ तास अष्टमी पुराच्या पाण्याच्या विळख्यात होते. ३५ तासांपेक्षा जास्त कालावधीनंतर पाणी ओसरले आहे. पहाटेपासून पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी घरातली साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील घरात, दुकानात नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेली दोन दिवस वीज नाही, मोबाईल नेटवर्क नाही, खाण्यापिण्याच्या समस्या होत्या. घरात जनावर येण्याची भीती वाटत होती. अशातच गेली दोन दिवस अष्टमीकरांनी जागत दिवस काढल्याचे दिसून येते. नगरपालिकेकडून त्यांना मदतीचा हात दिला जात होता. खाण्याची व्यवस्था करण्यात येत होती. अष्टमी शहरातील आलेल्या पुरामुळे झालेले नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अष्टमी ग्रामस्थ करीत आहेत.
कुंडलिका नदीला गेली दोन दिवस मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे कुंडलिका नदीच्या वर असलेल्या रोहा अष्टमी पुलावरून पाणी जात होते. आता पुलावरील पाणी ओसरले आहे. परंतु पुलाच्या दोन्ही बाजूचे काही ठिकाणी कठडे पाण्याच्या ओघामुळे तुटल्याचे दिसून येते. झाडे झुडपे पुलावर आल्याचे दिसून येत आहे. पाणी ओसरले असले तरी जुन्या पुलावरून वाहतूक सध्या बंद आहे. अजूनही पुलाला पाणी लागल्याचे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अद्यापही पूल वाहतुकीस खुला केलेला नाही. पुलावरील साफसफाई नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीचे पाणी ओसरण्यास लागले आहे. पाऊसही अधून मधून येताना दिसत आहे. खंडीत झालेली वीज पूर्ववत झाली आहे. काही अडचणी सोडल्यास वहातूक ही सुरुळीत होताना दिसत आहे. कामगारांना दिलासा मिळाल्याने ते कामावर जाताना दिसत आहेत. शाळेला मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी देण्यात आली आहे.