

जयंत धुळप
रायगड ः राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाने, आपल्या सर्वात उद्यमशील नौदल युनिट (मेनू) द्वारे आयोजित "कोकण विजय २०२६" या खुल्या सागरी नौकानयन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. ही मोहीम "स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध कोकण" या भावनेला मूर्त रूप देण्यासाठी आयाेजित करण्यात आली आहे.
येत्या दहा दिवसांत, महाराष्ट्र संचालनालयाचे ६० छात्रसैनिक (एनसीसी कॅडेट्स) भव्य आणि निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर १२७ सागरी मैलांचा प्रवास करतील. या मोहिमेत रनपार, आंबोळगड, पूर्णगड, धौलवाली आणि विजयदुर्ग या बंदरांना भेट देतील. भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पाठबळाने ही मोहीम आयोजित करण्यात आली असून, युवा छात्रसैनिकांमध्ये नौकानयन, सांघिक भाव, साहसी भाव आणि किनारपट्टीवरील पर्यावरण विषयक जागरूकता वाढवणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
एनसीसी गट मुख्यालय कोल्हापूरचे, ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. एनसीसी संचालनालय महाराष्ट्रचे संचालक कॅप्टन (आयएन) जेनिश जॉर्ज, भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी तळाचे कमांडिंग ऑफिसर कमांडंट शैलेश गुप्ता, रत्नागिरी पोलीस अधीक्षकनितीन बगाटे, आणि सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक अधीक्षक संदीप कृष्णा यावेळी उपस्थित होते.
ब्रिगेडियर पैठणकर यांनी छात्रसैनिकांच्या उत्साहाचे आणि समर्पणाचे कौतुक केले आणि अशा मोहिमा केवळ सागरी कौशल्येच वाढवत नाहीत, तर शिस्त, लवचिकता आणि राष्ट्राभिमानची भावना देखील निर्माण करतात, असे त्यांनी अधोरेखित केले. "कोकण विजय २०२६" ही मोहीम, भारताच्या भावी सागरी नेतृत्वाचे संगोपन करण्याबरोबरच स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध किनारी प्रदेशांना प्रोत्साहन देण्याच्या एनसीसीच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ आहे.