Raigad Rain
महाड : मागील 24 तासात महाड पोलादपूर मध्ये 671 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वर मध्ये 290, पोलादपूर मध्ये 168, तर महाडमध्ये 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाड पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या 48 तासापासून तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. विविध भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून याचा महाड मधील बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मोसमामध्ये पोलादपूर तालुक्यात आत्तापर्यंत 3409 मिलिमीटर, तर महाडमध्ये 2475 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांतून घराच्या भिंती, गोठ्याच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या असून तालुक्यातील दरडग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासन गुंतले आहे.
दरम्यान, प्रवासासाठी बंद असलेल्या वरंधा घाटामध्ये दरड कोसळल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे. शासनाकडून आज रेड अलर्ट घोषित करण्यात आला असल्याने शाळा व महाविद्यालयांना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुट्टी घोषित केली आहे. स्थानिक प्रशासनामार्फत सर्व आवश्यक उपाय करण्यात येत असून ग्रामस्थांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.