Ganeshotsav Dholki: डीजेच्या दणदणाटातही गणरायाच्या आरतीत ढोलकीचा ठेका

पारंपरिक वाद्याला गणेशोत्सवाचा आधार; उत्तर भारतातून येतात कारागीर; कोकणात पुन्हा जागी होते तीन पिढ्यांची कला
Ganeshotsav Dholki
Ganeshotsav DholkiPudhari
Published on
Updated on

सुवर्णा दिवेकर

अलिबाग: डीजेचा दणदणाट, आधुनिक साऊंड सिस्टीम आणि डिजिटल संगीताचा जमाना... संगीताचं स्वरूप झपाट्याने बदलत असताना कोकणातील घरगुती गणेशोत्सव मात्र आजही एका जुन्या तालाला जपून आहे.

गणरायाच्या आरतीत टाळ-मृदुंगासोबत ऐकू येणारा ढोलकीचा ठेका आजही अनेक घरांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. याच परंपरेमुळे एका पारंपरिक वाद्याला आणि ते तयार करणाऱ्या कारागिरांच्या कलेला नवं आयुष्य मिळत आहे.

Ganeshotsav Dholki
Mahad Paddy Bonus: खरेदी-विक्री संघात विकलेल्या भाताचा बोनस रखडला

गणेशोत्सव जवळ आला की रायगडच्या बाजारपेठांमध्ये मूर्ती, सजावट आणि पूजेच्या साहित्याबरोबरच ढोलकी विक्रीसाठीही लगबग सुरू होते. विशेष म्हणजे, या ढोलक्या विकण्यासाठी उत्तर भारतातील कारागीर दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोकणात दाखल होतात.

पेण परिसरात अरबाज इकबाल आणि त्यांचे सहकारी ढोलकी तयार करताना दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला उभारलेला तात्पुरता तंबू, बाजूला लाकडाचे ओंडके, हातातील पारंपरिक हत्यारे आणि तयार होत असलेल्या ढोलक्या... हे दृश्य एखाद्या छोट्या फिरत्या कारखान्यासारखंच दिसतं.

मात्र या ढोलकीमागची गोष्ट केवळ बाजारपेठेची नाही. या कलेला तीन पिढ्यांचा वारसा लाभला आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून शिकलेली कला पुढच्या पिढीकडे आणि पुढच्या पिढीकडून त्यानंतरच्या पिढीकडे... अशा पद्धतीने ही कला आजही जिवंत आहे.

ढोलकी तयार करण्यासाठी आंबा, शिसम, खैर, आईन यांसारख्या लाकडाचा वापर केला जातो. लाकडाचा प्रकार, आकार आणि दर्जानुसार तिची किंमत ठरते. साधारण ३०० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत ढोलक्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Ganeshotsav Dholki
Panvel crime news: खांदा कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून ५.४१ लाखांचा ऐवज लंपास

गणेशोत्सवाच्या काळात या ढोलक्यांची मागणी वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सवाची परंपरा. चाकरमानी गावाकडे परतल्यानंतर घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना होते. सकाळ-संध्याकाळ आरती होते आणि अनेक ठिकाणी आजही पारंपरिक वाद्यांच्या साथीने आरती करण्याची पद्धत कायम आहे.

आधुनिक संगीताने पारंपरिक वाद्यांना मागे टाकलं असलं, तरी गणेशोत्सवाने या कलेला एक वेगळीच बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. वर्षातील काही दिवस मिळणारा हा व्यवसाय या कारागिरांसाठी महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत ठरतो.

पेणपासून अलिबागपर्यंत आणि रायगडपासून रत्नागिरी-सिंधुदुर्गापर्यंत हे कारागीर गावोगावी फिरतात. गणरायाच्या आरतीसाठी ढोलकी खरेदी करणाऱ्या कुटुंबांमुळे त्यांची कला केवळ विकली जात नाही, तर पुढेही चालवली जाते.

आजच्या काळात अनेक पारंपरिक कला काळाच्या ओघात हरवत आहेत. मात्र गणेशोत्सवाने ढोलकीसारख्या वाद्याला अजूनही घराघरात जागा दिली आहे. त्यामुळे गणरायाच्या आरतीत वाजणारा प्रत्येक ठेका हा केवळ भक्तीचा सूर नसून एका पारंपरिक कलेच्या अस्तित्वाचा ठेका ठरत आहे.

आणि म्हणूनच...डीजेच्या दणदणाटातही कोकणातील घरगुती गणेशोत्सवात ढोलकीचा आवाज ऐकू येतोय... कारण हा केवळ ताल नाही, तर तीन पिढ्यांपासून जपलेल्या कलेचा वारसा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news