Kharghar Theft | सोने, प्लॅटिनम, हिरे आणि रोकड, खारघरमध्ये ज्वेलर्स दुकानातून १ कोटी ६४ लाखांचा ऐवज लंपास : मध्यरात्री धाडसी चोरी

शटर उचकटून अज्ञात चोरट्यांचा डल्ला; खारघर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
Kharghar Theft
सोने, प्लॅटिनम, हिरे आणि रोकड, खारघरमध्ये ज्वेलर्स दुकानातून १ कोटी ६४ लाखांचा ऐवज लंपास
Published on
Updated on

पनवेल : खारघर सेक्टर १२ येथील कॅन्डीअर लाईफस्टाईल ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर हत्याराच्या साहाय्याने उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ कोटी ६४ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीत हिरे, सोन्याचे आणि प्लॅटिनमचे मोठ्या प्रमाणात दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेली आहे. या घटनेमुळे खारघर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर १२ मधील सीआयएसएफ रोडवरील उत्सव चौक परिसरात साई कृपा प्रिमायसेस येथे कॅन्डीअर लाईफस्टाईल ज्वेलरी हे दुकान आहे. १० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले होते. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील दागिन्यांच्या विभागात हात साफ करत चोरट्यांनी ६८ लाख ९१ हजार ७७९ रुपये किमतीचे हिऱ्यांचे १३९ दागिने, १५ लाख ५७ हजार ३७९ रुपये किमतीचे सोन्याचे २७ दागिने तसेच ७९ लाख ५५ हजार ८१७ रुपये किमतीचे प्लॅटिनमचे ४८ दागिने लंपास केले. याशिवाय कॅश काउंटरमधील ३० हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी घेऊन पोबारा केला.

Kharghar Theft
Mumbai Metro | मुंबई मेट्रोच्या विस्तारामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येत घट...!

एकूण २३४ दागिने आणि रोकड मिळून १ कोटी ६४ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली असून, दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.

या प्रकरणी फिर्यादी नितीन सुधाकर वांदे यांच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३७१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ तसेच जुन्या भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साईप्रकाश चन्ना यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव हे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news