Khanderi Fort | खांदेरी किल्ल्यावर शिवकालीन ‘मंकला’ खेळांचे अवशेष
रायगड : शिवकाळात विविध खेळ दगडांवर कोरुन विरंगुळ्याकरिता निर्माण करण्यात आले होते. अशा प्रकारचे खेळ गडकोटांवर संशोधन निष्पन्न झाले आहेत. मात्र अलिबाग तालुक्यांतील थळ जवळच्या खांदेरी या सागरी किल्ल्यात प्रथमच ‘मंकला’ खेळांचे एकूण 12 अवशेष दिसून आले असून ते 368 वर्षांपूर्वींचे असल्याचे कालमापन देखील प्रथमच खात्रीशीररित्या करता येवू शकले असल्याची माहिती शिवकालीन बैठ्या खेळाचे अभ्यासक तथा भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पंकज भोसले यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.
रायगड, गोरखगड आदि सुमारे वीस किल्ल्यांवर गेल्या 15 वर्षांपासून आर्ट ऑफ प्लेइंग आणि आपला कट्टा या संस्थांच्या माध्यमातून संयुक्तपणे अशा प्राचिन खेळांच्याकरिता शोधमोहीमा सुरु आहेत. खांदेरी किल्ल्यावर सागरी किल्ल्यांवरील पहिलीच शोधमोहिम मे 2025 मध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये गणिती कौशल्य वाढवणार्या ‘मंकला’ या खेळाचे तटबंदीवर काळ्या कातळात 12 कोरीव अवशेष सापडले आहेत.
मुळात खांदेरी हा किल्ला 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महारांजांनी बांधला असल्याने मंकला या खेळाची येथे त्याच काळात म्हणजे 368 वर्षांपूर्वी निर्मीती करण्यात आले असल्याचे आपल्याला खात्रीशीररित्या सांगता येवू शकते असे पंकज भोसले यांनी पूढे सांगीतले.
आजवर राज्यातील विविध गडकोटांवर शोध मोहिमा झाल्या त्यात कोरीव मंकला खेळाचे अवशेष देखील सापडले आहेत. मात्र त्यांची कालखंड निश्चित सांगता येत नाही, मात्र प्रथमच खांदेरी येथील या खेळाची कालगणनेची उकल होवू शकली आहे, हे या मोहिमेचे महत्वाचे यश असल्याचे पंकज भोसले यांनी स्पष्ट केले.
खांदेरी किल्ल्यात बैठ्या खेळांच्या शोधमोहिमेत तटबंदीवर विविध ठिकाणी कोरलेले शिवकालीन खेळांचे 12 अवशेष सापडले आहेत. या पटांमध्ये मंकला हा खेळ प्रामुख्याने दिसतो. त्याशिवाय, वाघ-बकरी खेळाचेही कोरीव अवशेष आहेत. ‘मंकला’ हा खेळ गणिताचे कौशल्य वाढवणारा खेळ असून जगभर विविध नावाने प्रसिद्ध असल्याचे भोसले यांनी सांगितले.
आर्ट ऑफ प्लेइंग आणि आपला कट्टा या संस्थांच्या संयुक्त शोधमोहिमेत बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले, ममता भोसले, केतकी पाटील, सिद्धेश गुरव आणि अनिकेत पाटील सहभागी झाले होते.
‘मंकला’ या खेळामध्ये जमिनीवरील कातळात समांतर रेषेत समोरासमोर सात किंवा आठ खड्डे असतात. काही ठिकाणी चौकोनी किंवा आयताकृती पटही पाहायला मिळतात. राजधानी किल्ले रायगडावर अशा खेळांचे पट आहेत. त्यामुळे या खेळांचे अस्तित्व शिवकाळापासून असल्याचे सिद्ध होते. अशा प्रकारचे खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर 10 कोरीव अवशेष मिळाले आहेत.
खांदेरी येथील मंकला खेळाचे वैशिष्ट्य
खांदेरी येथे सापडलेल्या ‘मंकला’ खेळपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे समोरासमोर सात किंवा आठ खड्डयांऐवजी एकूण 27 खड्डे एकाच पटात दिसून आले आहेत. खेळाचे हे नवे स्वरूप आफ्रिकेमधील ‘बाओ’ या खेळाशी मिळते जुळते आहे. रायगडावर पाच ठिकाणी घरांच्या ओसरीवर हा खेळ दिसतो. मंकला हा खेळ जगभरात सर्वत्र खेळला जातो. विशेषत: आफ्रिकेत तो खूप प्रचलित आहे. महाराष्ट्रातील कार्ले, भाजे, बेडसे, आगाशीव, गडद लेणी या सर्व ठिकाणी हा खेळ कोरलेला आहे.
जलदुर्गांवर सापडलेला पहिलाच खेळ
खांदेरी येथे सापडलेला दुसरा खेळ हा शिकारीचा खेळ म्हणून ओळखला जाणारा वाघ-बकरी खेळ तटबंदीवर दोन ठिकाणी सापडला आहे.त्यावरील रेखीव अवशेष अस्पष्ट स्वरूपात दिसत आहेत. एके ठिकाणी ढासळलेल्या तटबंदीवर, मोठ्या दगडावर हा खेळ कोरलेला आहे. महाराष्ट्रातील जलदुर्गांवर सापडलेला हा पहिलाच खेळ आहे, असा दावा पंकज भोसले यांनी केला आहे.

