

खालापूर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे माती उत्खनन सुरू असताना सर्वसामान्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला माहिती मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणार्या मातीमाफीयांना पाठीशी घालण्याचे काम करणार्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यात कारखानदारी, गृहप्रकल्प, वीट भट्टी व्यवसाय, याशिवाय अनेक ठिकाणी सुरू असलेली भरावाची काम यासाठी मातीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता भरमसाठ उत्खनन अनेक ठिकाणी सुरू आहे. उंबरे येथे मातीच्या भरावाखाली दोन कामगार दाबून मेल्याची घटना नुकतीच घडली होती. दुर्घटनेनंतर या प्रकरणाचा बोभाटा जरी झाला असला तरी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात माती उत्खनन आणि उत्खनन केलेल्या मातीची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यात खोपोली, चौक, कलोते, माडप, वावोशीसह अनेक भागात जेसीबी, पोकलनच्या साह्याने दररोज शेकडो ब्रास माती उत्खनन होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे शासनाची कोणतीही परवानगी न घेता आवश्यक ती रॉयल्टी न भरता माती उत्खनन सुरू संबंधित विभागातील तलाठी आणि मंडल अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा नोटीस पाठवत नसल्याने शासनाचे तिजोरी मात्र रिकामी राहत आहे.
काही ठिकाणी तर शासकीय जागेत उत्खनन होत असताना तलाठी आणि मंडल अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून वावरत असल्याने शासनाचा महसूल बुडवणार्या माती माफियावर दंडात्मक तसेच फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होत आहे.
दिवसाढवळ्या उत्खनन सुरू असून देखील ठोस कारवाई होत नाही.तर काही ठिकाणी जुजबी रॉयल्टी घेऊन त्यापेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन सुरू आहे. याबाबत तहसीलदार खालापूर यांच्याकडे तक्रार केली आहे.
- दीपक जगताप, भाजपा शहर अध्यक्ष, खालापूर
तालुक्यातील माती उत्खननाबाबत तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत माहिती घेऊन योग्य त्या सूचना देण्यात येतील.
-अभय चव्हाण, तहसीलदार