

खोपोली : शिवसेना शिंदे गटाच्या चार पदाधिकार्यांच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संदेश पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून या चौघांची ओळख आहे.शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुका सहसंघटक तेजस उतेकर, युवासेना तालुका संघटक अमोल बलकवडे, शिवसेना तालुका समन्वयक अशोक मरागजे आणि योगेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली.
गोदरेज कंपनीत माल पुरवठा काम करणार्या एका ठेकेदाराने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असला तरी मंत्रालयस्तरावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना होते अशी सुत्रांची माहिती आहे. गोदरेज कंपनीत अश्पाक खमसे हे मटेरिअल सप्लायचे काम करतात. त्यांच्या डंपरचा चालक सय्यद गफार सय्यद याला 1 जून रोजी एका फॉरच्युनरमधून आलेल्या सात जणांनी कंपनीने आम्हाला काम दिले आहे. परंतु कंपनी रेट कमी देत असल्याने काम बंद केले असून रेट वाढवून देत नाही तो पर्यंत सप्लाय करायची नाही असे सागंत जीवे मारण्याची धमकी दिली होती तसेच रॉयल्टीची पावती घेऊन पळ काढला. अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने गोदरेजच्या व्यवस्थापनाने मंत्रालय स्तरावर याची तक्रार केली होती.
तातडीने पोलीस अधीक्षक आचल दलाल जिल्हाधिकारी किशन जावळे आणि प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी तहसील कार्यालयात बैठक घेऊन अशा प्रकारे कारखान्यांना दिला जाणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तेजस उतेकर, अमोल बलकवडे, अशोक मरागजे आणि योगेश शिंदे हे शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने या पाठीमागे आणखी कोण गॉडफादर आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.