

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
गणेशोत्सवाची धामधूम संपली असताना पावसाने देखील उभारी घेतली होती, मात्र आता पुन्हा पावसाने बरसात सुरु केली आहे. ठिकठिकाणी निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले असून सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या आदिमायेच्या जागराचे वेध आता खाडीपट्टा वासियांना लागले आहेत. त्यासाठी गावोगावी स्वच्छता अभियान, उत्सवासाठी लागणार्या साधनसामग्रीसह सभा मंडपाची तयारी यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आयोजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गणपतीच्या उत्सवामध्ये पूर्ण सात दिवस पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
एकीकडे बाप्पाच्या आगमनाने झालेला आनंद आणि वातावरणामध्ये चैतन्यमय निर्माण झालेले असताना, मात्र दुसरीकडे पावसाच्या सततच्या रिमझिममुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तरीसुद्धा गणेश भक्तांमध्ये आनंदाला उधाण आले होते. ठिकठिकाणी लाडक्या गणरायाच्या पूजा-आरती, भजनामध्ये भक्तगण तल्लीन झाले होते. लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आता सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या आदिमायेच्या जागराचे खाडीपट्टावासियांना वेध लागले असल्याचे पाहायला मिळत आहे.
खाडीपट्टयात ठिकठिकाणी गावची रक्षणकर्ती, ग्रामदेवता आदिमाया आदिशक्तीचा नऊ दिवसांच्या उत्सवासाठी सगळी गावे आता सज्ज झाली असून उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. घटस्थापना ते विजयादशमी दसरा असा दहा दिवसांचा हा उत्सव गावोगावी मोठ्या भक्तिमय वातावरणासह मोठया उत्साहाच्या वातावरणात आणि दररोज देवीसमोर माळ चढवून साजरा केला जातो. दसर्याच्या दिवशी सोना (आपटयाची पाने) लुटून एकमेकाला अलिंगण देऊन सोने देण्याची ऐतिहासिक प्रथा जतन केली जाते ज्यातुन समृध्दी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. यादरम्यान दुरवर असणार्या पाहुणेमंडळींसह गावच्या माहेरीवाशीनी देखील अवर्जून देवीची ओठी भरण्यासाठी गावी येत असतात त्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण पसरलेले असते.
आदिशक्ती, आदिमायेच्या नवरात्रोत्सवास सोमवारी (दि. 22) प्रारंभ होत आहे. उत्सवासाठी आता घरोघरी, ग्रामदेवीच्या मंदिरी लगबग सुरू झाली आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी शहराच्या बाजारपेठेत गर्दी देखील पाहायला मिळत केली.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सव दणक्यात साजरा केल्यानंतर भाविकांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. स्त्रीशक्तीचा जागर असलेल्या या उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी केली जात आहे. खाडीपट्टयात घरोघरी तसेच ग्रामदेवतेच्या मंदिरी नऊ दिवस घट बसणार आहेत. त्यासाठी लागणार्या साहित्याच्या खरेदीचा ठिकठिकाणी जोर वाढलेला पाहायला मिळत आहे.
देवींच्या मूर्तीच्या रंगरंगोटीमध्ये कलाकार मग्न झाले आहेत. या उत्सव दरम्यान गावागावात मंडप घालून देवींच्या मूर्तीसाठी सुंदर सजावट आणि नवरात्री गरबा नूत्य, नऊ रात्रीच्या नऊ रंगांची उधळण, विविध स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. त्यासाठी लागणार्या साहित्यासह निटनिटक्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांच्या सभा, नियोजनाची धावपळ वाढली असून साहित्य खरेदी करण्यात कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले असून सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच गावाचा परिसर स्वच्छतेला विशेष महत्व दिले जात असल्याचे खाडीपट्टयात फेरफटका मारला असता पाहायला मिळाले.