

महाड : महाड औद्योगिक वसाहती मधील एका बंद असलेल्या कंपनीमध्ये चार दिवसापूर्वी टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये केटामाईन या अमली पदार्थाच्या सुमारे 89 कोटी रुपयांचा साठा आढळून आला होता या संदर्भात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
गुरुवारी त्यांना माणगाव येथील सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली, शुक्रवारी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी देण्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
या प्रकरणात महाड औद्योगिक वसाहती मधील रोहन केमिकल्स या कारखान्याचे मालक रोहन गवस यांच्यासह मच्छिंद्र तुकाराम भोसले राहणार जिते तालुका महाड, सुशांत संतोष पाटील रा. मोहोप्रे तालुका महाड, शुभम सदाशिव सुतार रा. नागलवाडी तालुका महाड (मूळ राहणार पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर) या चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील रोहन गवस याचा तपास पोलिसांकडून सुरू असून तो अद्याप हाती आला नसल्याचे सांगण्यात आले. अमली पदार्थ उत्पादनाची पाळेमुळे शोधून काढताना या संदर्भात अजून काही आरोपी सापडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पोलीस कछडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली. या मागणीचा विचार करून न्यायालयाने संबंधित आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.