Katkari women self-reliance initiative : सुधागडातील कातकरी महिलांनी शोधला स्थलांतराला पर्याय

मजुरीच्या जंजाळतूनही होणार मुक्त; कातकरी महिलांचा गट शेतीचा अनोखा प्रयोग
Katkari women self-reliance initiative
सुधागडातील कातकरी महिलांनी शोधला स्थलांतराला पर्यायpudhari photo
Published on
Updated on

सुधागड ः संतोष उतेकर

भाताचे कोठार असणार्‍या रायगड जिल्ह्यात भात शेतीचे क्षेत्र घटत आहे. दुसरीकडे या शाश्वत रोजगारात घट झाल्याने रोजगारासाठी राज्यात-परराज्यात होणारे स्थलांतर वाढत आहे. मात्र सुधागड तालुक्यातील चिखलगाव आदिवासी वाडीतील ‘भवानी बचत गटाच्या’ महिला स्थलांतर थांबवण्यासाठी व आयुष्यभराच्या मजुरीच्या चक्रातून बाहेर पडण्याची धडपड करत स्वतः भातशेती करण्यासाठी पुढे आल्या आहेत. नुकतेच या महिलांनी मिळून भात लावणी केली. यावेळी कृषी अधिकारी देखील शेतात उतरले होते.

पिढ्यानपिढ्या इतरांसाठी मेहनत करत राहिलेला आदिवासी समाज आता स्वतःसाठी मेहनत करून वर्षभराची किमान बेगमी करण्याचा प्रयत्न करताना मात्र एकटा पडताना दिसतो. म्हणूनच या प्रयत्नात त्यांच्या हातांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ (चझडच्) संस्था प्रयत्न करत आहे. गटशेतीच्या विविध टप्प्यावर आवश्यक सर्व सहकार्य आणि मार्गदर्शन करत आहे.

कातकरी महिलांच्या या शेतीगटाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ आयोजित या भातलावणी कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम, शेती व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, सर्पमित्र अमित निंबाळकर, समाजबंध संस्थेचे सचिन आशा सुभाष यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. सोबतच कृषी सहाय्यक, विभाग कृषी अधिकारी, समाजबंध संस्थेचे कार्यकर्ते, प्रबोधन युवा प्रेरणा शिबिरातील युवा व महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ टीम याची विशेष उपस्थिती होती.

यावेळी कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी रोपलावणीच्या आधुनिक पद्धतींबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रत्यक्ष भातलावणी मध्येही सहभागी होवून प्रात्यक्षिक दाखवले. याआधी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ आयोजित बीजप्रक्रिया कार्यशाळेच्या माध्यमातून पेरणी केलेल्या जया व कोमल या जातीच्या बियाण्याला योग्य बीजप्रक्रिया करण्यात आलेली आहे. यावेळी देखील कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते.

स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न

आदिवासी समाजातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर हा मोठा प्रश्न शासन व समाजसेवी संस्था यांच्यासमोर आहे. यासाठी अशा प्रकारे महिला गटांना शेती, कडधान्य, तृणधान्य लागवडीसाठी प्रोत्साहन देवून सर्वोतोपरी मदत करण्याचे काम महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्था करत आहे. महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्था सुधागड तालुक्यातील 16 आदिवासी वाड्यांसोबत आवश्यक कागदपत्रे, योजना, शेती, वनौपज- वनौषधी, मच्छिमार, युवक अशा घटकांसाठी काम करत आहे. याच कामाचा भाग म्हणून गटशेतीची हि प्रक्रिया सुरु आहे.

एकीकडे आदिवासींच्या जल-जंगल-जमीन या नैसर्गिक अधिकार असलेल्या साधनसंपत्तीवर अनेक प्रकारे घाला व अतिक्रमण होत असतानाच अशा प्रकारे कातकरी समाजातील महिलांनी समोर येवून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा केलेला गटशेतीचा प्रयत्न हे कातकरी समाजासाठी व पुढील पिढीसाठी एक आदर्श उदाहरण आहे.

सतीश शिर्के, समन्वयक, महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ, सुधागड-पाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news