Karjat monsoon tourism : कर्जत तालुक्यात वीकेंड हाऊसफुल्ल

पावसाळी पर्यटनाची मोठी गर्दी, वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण
Karjat monsoon tourism
कर्जत तालुक्यात वीकेंड हाऊसफुल्लpudhari photo
Published on
Updated on

कर्जत : पावसाळा सुरू होताच कर्जत तालुक्यातील पर्यटनस्थळांना अक्षरशः पर्यटकांची मांदियाळी लोटली आहे. मुंबईपासून केवळ दीड ते दोन तासांच्या अंतरावर असलेला हा निसर्गरम्य तालुका आता पावसाळी पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनला आहे.

कर्जत तालुक्यात सुमारे 5000 पेक्षा जास्त रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसेस असून, याठिकाणी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या परिसरातून हजारो पर्यटक विकेंडला गर्दी करत आहेत. वाहनाने अथवा लोकल ट्रेन पकडून पर्यटक कर्जत गाठत आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार तसेच अन्य दिवशीही कर्जत शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत आहे. आणि यामुळेच वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेषतः शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत आहेत. काही पर्यटक तर आठवड्याच्या मध्यातच आगाऊ बुकिंग करून येत आहेत. सध्या जुलै आणि आगामी ऑगस्ट महिन्यातील सर्व विकेंडसाठी जवळपास बहुतेक रिसॉर्ट्स हाऊसफुल असल्याचे रिसॉर्ट मालकांकडून सांगण्यात आले आहे. अनेक ठिकाणी अजूनही बुकिंगसाठी विचारणा सुरू असून, काहींना जागा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

कर्जतमधील निसर्गाच्या सान्निध्यात असलेली विविध फार्महाऊसेस पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या सर्व ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग अधिकच खुलतो. त्यामुळेच गटारी अमावस्येच्या आधीचा व त्यानंतरचा काळ कर्जतमध्ये विशेष गर्दीचा ठरणार आहे.

कर्जत तालुक्याला पर्यटनाचे वरदान लाभले असले तरी या विकासाबरोबरच योग्य नियोजनाची गरज भासत आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, पार्किंगची व्यवस्था, वाहतूक नियंत्रणासाठी अधिक मनुष्यबळ व आधुनिक साधनसंपत्ती यांचा विचार आता तातडीने करणे गरजेचे झाले आहे.

वाहतूककोंडीची समस्या गंभीर

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कर्जत शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. विशेषतः कर्जतच्या प्रवेशद्वारावर असलेला चारफाटा आणि श्रीरामपूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबते. शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये स्थानिक रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलीस यंत्रणा कोंडी टाळण्यासाठी प्रयत्नशील असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक लेन तोडून वाहन पुढे घेऊन जातात, त्यामुळे अडथळा वाढतो. अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

वाहतूक कोंडीमुळे केवळ पर्यटकच नव्हे तर स्थानिकांनाही दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे. विशेषतः रुग्णवाहिका, वैद्यकीय आपत्कालीन सेवा आणि शाळा-कोलेजच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news