Karanja Port | करंजा बंदर मच्छिमारांसाठी वरदान, कोट्यवधींची होतेय उलाढाल

तीन महिन्यांपूर्वी बंदर सुरू ; दररोज 200 टन मासळीची विक्री
Karanja Port
करंजा बंदर
Published on
Updated on
उरण : राजकुमार भगत

मागील कित्येक वर्षापासून रखडलेले करंजा मच्छिमार बंदर मागील तीन महिन्यापूर्वी सूरू करण्यात आले असून या मच्छिमार बंदरातून रोज सुमारे 150 ते 200 टन मच्छिची विक्री, निर्यात होत असून मच्छिमारांसाठी हे बंदर वरदान ठरले आहे. अल्पावधीत जम बसवलेल्या या बंदरातून रोज कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असल्याने मच्छिमारांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आपली मच्छी आपल्या गावातच विकता येत असल्यामुळे आणि ससून डॉक पेक्षा मच्छिला जास्त भाव मिळत असल्याने हे बंदर मच्छिमारांसाठी वरदान ठरत आहे.

मागील 12 वर्षांपासून अपुरा निधी आणि ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे रखडत-रखडत सुरू असलेले करंजा मच्छीमार बंदर रखडले होते. मेरी टाईम बोर्डाने हे मच्छिमारी बंदर मत्स्यविभागाकडे जरी वर्ग केले होते तरी करंजा बंदराचे उद्घाटन झाले नव्हते. स्थानिक मच्छिमारांनी ऑगस्ट महिन्यात स्थानिक आमदारांसमक्ष बळजबरीने या बंदराचे उदघाटन केले होते. सध्या या बंदरातून गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आदी राज्यात मच्छि जाते. रोज शेकडो ट्रक या बंदरातून मच्छिमारी खरेदीसाठी येतात. नुकतेच करंजा येथिल एका मच्छिमाराने त्याची मच्छि 1 कोटी पेक्षा अधिक रूपयांचा भाव मिळाला आहे. मुंबईच्या ससुनडॉक बंदरावरील ताण कमी करण्यासाठी करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदरउभारणीस सुरूवात करण्यात आली होती. कामातील त्रुटी दूर करणे आणि सातत्याने वाढणार्‍या कामासाठी होणार्‍या विलंबामुळे 84 कोटी खर्चाचे काम 150 कोटींपर्यंत पोहोचले आहे. ठेकेदाराच्या विलंबामुळे या खर्चातही त्यानंतर 35 कोटींची वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील हजारो व्यावसायिक, मच्छीमारांसाठी वरदान ठरणार असल्याने सर्वांनाच बंदराचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा लागुन राहिली होती. मच्छीमारांसाठी महत्वपूर्ण ठरणारे बंदर खुले करण्याच्या संबंधित विभागाचे मंत्री, अधिकार्‍यांनीही अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या होत्या.

काही कामे अपूर्णच; 120 कोटींची गरज

बंदरातील राहिलेली अंडर वॉटर टँक, टॉयलेट ब्लॉक,स्टोन्स पिचिंग, अंतर्गत रस्ते, बोटींकरीता सिग्नल टॉवर आदी कामे अद्यापही काही प्रमाणात अपुर्ण आहेत. तसेच या करंजा मच्छिमार बंदराला जोडणारा द्रोणागिरी माता मंदिराजवळून येणार्‍या रस्त्याला येथिल स्थानिकांचा विरोध असल्यामुळे या बंदराला जोडणारा रस्ता अद्याप पुर्ण झाला नाही. त्यातच आत्ता या बंदरामध्ये मासळी लिलाव करण्यासाठी शेड उभारण्यासाठी सुमारे 120 कोटी रूपयांची गरज आहे.

आमच्या अपेक्षा पेक्षा जास्त उलाढाल येथून होत आहे. ससून डॉक पेक्षा अधिक भाव आमच्या मच्छीला मिळत आहे. रोज येथे 150 ते 200 टन पर्यंत मासळीची विक्री होते. देशभरातील मच्छि कंपन्याचे व्यापारी येथे येवून स्वतः मच्छि खरेदी करत आहे. आणखी पायाभूत सोयी, शेड आणि रूंद रस्ते झाल्यास हे मच्छिमार बंदर आणखी भरभराटीस येईल. - नारायण नाखवा, माजी चेअरमन, करंजा मच्छिमार सोसायटी

करंजा बंदर कार्यान्वयीत झाल्यामुळे मच्छिमारांना वरदान ठरले आहे. आम्हाला आमची मच्छी थेट घरातूनच विकता येते. मच्छीला दर देखिल चांगला मिळत असल्याने हे बंदर आम्हाला खूप फायदेशीर आहे. हे बंदर व्हावे यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आमचे मच्छिमार सदा ऋणी राहतील. - रमेश नाखवा, माजी चेअरमन, करंजा मच्छिमार सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news