Raigad crime news | मंजूर आराखड्याला हरताळ; कामोठ्यात जादा मजले बांधल्याप्रकरणी विकासकांवर गुन्हा दाखल

कामोठ्यात अनधिकृत ‘जी+१५’ बांधकामप्रकरणी विकासकांवर गुन्हा दाखल
Raigad crime news | मंजूर आराखड्याला हरताळ; कामोठ्यात जादा मजले बांधल्याप्रकरणी विकासकांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या कामोठे प्रभागात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सेक्टर २२ मधील भुखंड क्रमांक ७३ व ७४ येथे मंजूर आराखड्यापेक्षा जादा मजले उभारल्याप्रकरणी संबंधित विकास मे. एल. के. दिवाणी इन्फ्रा, पार्टनर्स प्रा. लि चे कमलेश कुमार लक्ष्मणभाई पटेल, मनोज वसंतलाल कोठारी विरुद्ध कामोठे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तळमजला अधिक ११ मजल्यांची परवानगी असताना प्रत्यक्षात तळमजला अधिक १५ मजले (G+15) उभारण्यात आल्याचे पाहणीत निष्पन्न झाले असून, तीन मजले अनधिकृत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे कामोठे परिसरातील बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘क’ कामोठेचे अधीक्षक दशरथ अनंदा भंडारी यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून सविस्तर तक्रार नोंदवली आहे. पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संबंधित विकासक – कमलेश कुमार लक्ष्मणभाई पटेल, मनोज वसंतलाल कोठारी व इतरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. नगररचना विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सदर भुखंड सिडकोच्या १२.५ टक्के योजनेअंतर्गत असून दि. ३१ फेब्रुवारी २०२२ रोजी तळमजला अधिक ११ मजल्यांची बांधकाम परवानगी देण्यात आली होती.

मात्र, स्थानिक तक्रारीनंतर करण्यात आलेल्या पाहणीत प्रत्यक्षात तळमजला अधिक १५ मजल्यांचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच मंजूर आराखड्यापेक्षा किमान तीन मजले जादा उभारण्यात आले होते. या अनुषंगाने संबंधित विकासकांना प्रथम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६७ (१) व (२) अन्वये नोटीस देऊन काम तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही बांधकाम सुरूच राहिल्याने कलम ४७८ (१) अंतर्गत पुन्हा नोटीस बजावण्यात आली. पुढे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम ५२, ५३, ५४ व ५५ अन्वये अंतिम नोटीस देऊन अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचे अथवा मंजूर आराखड्यानुसार पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र वारंवार नोटिसा देऊनही विकासकांकडून कोणतीही दखल न घेतल्याने अखेर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

सदर इमारतीची चतु:सीमा पूर्वेस शिवनेरी सोसायटी (प्लॉट नं. ७५ए), पश्चिमेस लोटस कोर्ट सोसायटी (प्लॉट नं. ७१ए), दक्षिणेस चिरायु हॉस्पिटल व अंचित होम्स (प्लॉट नं. ७७) तर उत्तरेस सेक्टर २२ मधील मुख्य रस्ता व हावरे सोसायटीकडे जाणारा मार्ग अशी आहे. दाट लोकवस्तीच्या या भागात उंच इमारतीचे नियमबाह्य बांधकाम झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फ्लॅट विकत घेणाऱ्यामध्ये संभ्रम

एल. के. दिवाणी इन्फ्राचे बांधकाम व्यावसायिक पटेल यांनी कामोठ्यात उभा केलेल्या, इमारतीचे तीन मजले अनधिकृत असल्याने, इमारती मध्ये बुकिंग केलेल्या ग्राहक मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, आम्हाला आमची घरे मिळतील का असा प्रश्न ग्राहका समोर पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news