

खोपोली : खोपोलीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. बीडमध्ये जे घडलं तेच रायगडमध्ये रक्तरंजीत राजकारण घडत आहे. दरम्यान खोपोलीजवळ भर रस्त्यावर वार करत मंगेश काळोखे यांची हत्या करणाऱ्या आठ आरोपींना पोलिसांनी शनिवारी अटक केली.
हत्या ही आमच्यातील वादातून झाल्याची प्राथमिक कबुली आरोपींनी दिली आहे. काळोखे हत्या प्रकरणामुळे खोपोली परिसर हादरून गेला होता. भर रस्त्यात काळोखे यांच्यावर कोयता कुऱ्हाडीने वार करत हत्या केली होती. या प्रकरणाला राजकीय रंग असल्याने प्रकरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान 27 डिसेंबर रोजी सकाळी नागोठणे येथुन हत्येतील आरोपी रविंद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य सहा आरोपींना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे मात्र त्यांची नावे अद्याप सांगण्यात आलेली नाहीत. एकूण आठ आरोपींना अटक केल्यावर पुढील अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस करत आहेत.
हत्येचा कट सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील बंगल्यावर रचला - आमदार महेंद्र थोरवे यांचा आरोप
खोपोली येथील शिंदे शिवसेनेच्या काळोखे यांच्या निर्घृण हत्येचा कट सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील बंगल्यावर रचला गेला असा थेट आरोप कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी हा कट तटकरेंच्याच बंगल्यावर शिजला आणि त्यानंतर ही हत्या झाली असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. खऱ्या अर्थाने या प्रकरणात सुनील तटकरे हे आका आहेत. असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी एकत्रितपणे येऊन मंगेश काळोखेंची हत्या केली. धारदार हत्यारांनी मंगेशची हत्या करण्यात आली आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा सुनील तटकरे कर्जतमध्ये आले होते. त्यांनी जाहरीरपणे या ठिकाणी सांगितलं की, सुधाकर घारे यांचा या हत्येशी काहीही संबंध नाहीय. सुधाकर घारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यानींच मंगेशची हत्या केली. त्यांना वाचवण्यासाठी सुनील तटकरे कर्जतमध्ये आले. पोलिसांचा तपास अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. तरीसुद्धा सुनील तटकरे घाईघाईत प्रतिक्रिया देऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत
तपासयंत्रणांचा तपास पूर्ण झालेला नाही. सुधाकर घारेचा चुलत भाऊ महेंद्र घारे यांनी असे कमेंट्स केले की, दुसरा नंबर हा भासेचा लागणार आहे. संकेत भासे हा माझा भाचा आहे. जो कायदेशीर काम पाहतो. तो कर्जतमध्ये नगरसेवक आहे. त्याला सुद्धा मारण्याचा दुसरा नंबर लावणार आहे. पहिला नंबर मंगेश काळोखेचा लावला, हे सुधाकर घारेचा भाऊ जाहीरपणे कबुल करतोय. मीडियाच्या माध्यमातून माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांना विनंती आहे की, सुधाकर घारे, महेंद्र घारे आणि भरत भगत यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. हे दोषी आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी आम्ही करत आहोत. शिंदे साहेब स्वत: मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आले होते, असंही थोरवे म्हणाले.
हत्येशी कोणताही संबंध नाही, एस आयटी नेमून चौकशी करा -सुनील तटकरेंचे प्रतिआव्हान
खोपोली येथील शिंदे शिवसेनेच्या काळोखे यांच्या निर्घृण हत्येचा कट सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील बंगल्यावर रचला गेला असा थेट आरोप कर्जतचे आमदार महेंद्रथोरवे यांनी केला आहे. तर सर्व आरोप निराधार आहेत, हिंमत असेल तर एसआयटी नेमून चौकशी करा, असे प्रतिआव्हान सुनील तटकरे यांनी दिले आहे. काळोखे प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा आणि सत्य वदवून घ्या असे सांगताना सुनील तटकरे यांनी काळोखे प्रकरणाशी आमचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा कोणताही संबंध नाही, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी हा कट तटकरेंच्याच बंगल्यावर शिजला आणि त्यानंतर ही हत्या झाली असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
खोपोलीत काल घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो. तपास यंत्रणेचे काम सुरु आहे. आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक एक कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो तपास होईल. या बद्दल माझ्या मनात संदेह असण्याचे काही कारण नाही. सुधाकर घारे एक सुस्वभावी, जनतेची कदर असणारा जनतेला न्याय देणारा नेता म्हणून कर्जत-खालापूर तालुक्यात निश्चित पणाने आपले एक स्थान जन माणसात निर्माण केले आहे. तपास चालू आहे. त्यामुळे काही बाबतीत मर्यादेमध्ये बोलणे क्रमप्राप्त आहे. श्रद्धा, सबुरी, संयमामधून सत्य निर्विवादपणे बाहेर येईल. कुणीही आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर देऊ नये. असा सल्ला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
काल खोपोलीत शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची घटनेत निघृण हत्या झाली. त्यामध्ये संशयित म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांची नावे आल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जत मधील जनसंपर्क कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
तटकरे पुढे म्हणाले, या घटने बद्दल मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. त्यांच्या कडे एसआयटीची मागणी देखील करीन. इथे जाहीरपणे बोलणे इच्छित नाही. तुमच्या पैकी अनेकांनी जे आता काही घडले आहे. त्याचा अनुभव वेगळा वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. कारण सत्य हे सत्य आहे. सत्याची कास धरत त्याच्या पाठीमागे उभे राहणे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे हजार टक्के कर्तव्य आहे. त्यात तसूभरही कमी पडणार नाही.
आरोपींना फाशी होईपर्यंत पाठपुरावा करणार: उपमुख्यमंत्री शिंदे
“ही दुर्देवी घटना घडली. मंगेश काळोखे हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. मात्र, अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. नियोजित कट रचून ही हत्या आहे. या घटनेनंतर येथील जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. जे कोणी या प्रकरणात आरोपी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन आणि विशेष सरकारी वकील देऊन आणि मकोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी काळोखे यांच्या कुटुंबियांची देखील भावना आहे.
नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती समाजासाठी घातक आहे. असे सूडाचे राजकारण पुन्हा होता कामा नये. अशा वृत्तींना फासावर लटकवणे ही काळाची गरज आहे”, असे शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंना भेटताच काळोखे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आरोपींवर मोका लावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी यावेळी केली.
खोपोलीतील शिवसेना नेते मंगेश काळोखे यांच्याबद्दल द्वेषाची भावना मनात ठेऊन नियोजित कट एखाद्याला संपविणे निंदनीय आहे. समाविघातक वृत्ती ठेचून काढण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक वर घेऊन सरकारी वकील देवून आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार.
एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री