Trekkers Rescued : ‘112' नंबरवर एक फोन अन् सहा ट्रेकर्सची सुटका...! कल्हेच्या डोंगरावर अंधारात वाट चुकली, पोलिसांची थरारक शोधमोहीम!

दीड तासांच्या थरारक शोधमोहीमेनंतर पनवेल तालुका पोलिसांकडून तरुणांची यशस्वी सुटका
जंगलातून सुखरुप सुटका केलेले ट्रेकर्स सोबत पोलिस कर्मचारी
जंगलातून सुखरुप सुटका केलेले ट्रेकर्स सोबत पोलिस कर्मचारी
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : ट्रेकिंगचा उत्साह क्षणात भीतीत बदलला आणि सहा तरुणांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला. कल्हे गावाजवळील डोंगरावर अंधारात वाट चुकल्याने मदतीसाठी त्यांनी '112' या आपत्कालिन क्रमांकावर धाव घेतली. त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी जीवाची पर्वा न करता रात्रीचा डोंगर चढत, मोबाईल लोकेशन आणि नकाशाच्या मदतीने राबविलेल्या दीड तासांच्या शोधमोहीमेत सहाही ट्रेकर्सना सुखरूप खाली आणून संभाव्य दुर्घटना टाळली.

आयुष संदीप गुप्ता (कळंबोली), वेदांत किरण दिवेकर (खांदा कॉलनी), वेदांत नितीन नाईक (रोडपाली), आदित्य जयराम राय (खारघर), प्रसनजीत कुंदन कांबळे (सीवूड) आणि निखिल जयस्वार (रोडपाली) हे सहा मित्र शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी सुमारे तीन वाजता रानसई-खैरकुटी (उरण) येथून ट्रेकिंगसाठी निघाले होते. ट्रेक करत ते कल्हे गावाजवळील डोंगरमाथ्यावर पोहोचले. मात्र सायंकाळी अंधार पडल्यानंतर त्यांचा मार्ग चुकला. आजूबाजूला घनदाट जंगल, खोल दऱ्या आणि कोणतीही वाट दिसत नसल्याने ते पूर्णपणे अडकून पडले.

अखेर त्यांनी '112' या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधत मदतीची याचना केली. माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय दोरगे, पोलीस शिपाई तुकाराम भोये आणि पोलीस पाटील संतोष मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

डोंगर परिसरात काळोख दाटलेला असल्याने शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. मात्र ट्रेकर्सशी मोबाईलवर सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या लोकेशनचा मागोवा घेण्यात आला. सुमारे दीड तास अथक प्रयत्नांनंतर बचाव पथक सहा जणांपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांना सुरक्षित मार्गाने खाली आणून सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

वेळीच केलेल्या फोनमुळे आणि पोलिसांच्या तत्पर बचावकारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. पावसाळ्यात ट्रेकिंग करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे आणि अपरिचित डोंगररांगांमध्ये अंधार होण्यापूर्वीच परतीचा प्रवास सुरू करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news