

कळंबोली : दीपक घोसाळकर
कळंबोली शहरात अनेक प्रसिद्ध असणारी देवी - देवतांची मंदिरे आहेत, असेच एक कळंबोली सेक्टर 1 येथील प्रसिद्ध असे जय तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या जय तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम असणार्या या उत्सवाची धामधूम सुरू असून, आदिशक्तीच्या उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्याच्या आधुनिकतेच्या युगात व तरूणाईचे आकर्षण असलेल्या डिस्को दांडियाच्या काळातही येथील नवरात्रोत्सव आपले वेगळेपण टिकवून आहे. या उत्सवाला कळंबोली शहरातील अनेक ठिकाणांहून भाविक आवर्जून हजेरी लावतात.
1997 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या देवीच्या साध्या असणार्या मंदिराचा जीर्णोद्धार करून आरसीसी पध्दतीने, सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर उभारण्यात आले आहे, मंदिराच्या मध्येभागी संगमरवरी प्रभावळरूपी चौथरा तयार करून त्यावर तुळजाभवानी मातेची मुर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तीच्या दैनंदिन पुजा अर्चेचा मान सेक्टर 1 मधील भाविकांना प्रत्येक दिवशी देण्यात येतो. देवीची दररोज सांजवेळी आरती होते. विविध सन - उत्सवाच्या निमित्ताने देविची उपासना केली जाते. नवसाला पावणारी देवी असल्याने इथे नेहमीच भक्तांची गर्दी दिसून येते. मांगल्याचे प्रतिक असलेल्या नवरात्र उत्सव येथे दिमाखदारपणे साजरा केला जातो.
मागील 28 वर्षापासुन अविरत सुरु असलेले रक्तदान शिबीर जय तुळजाभवानी संस्था व एम.जी.एम हॉस्पिटल कामोठे यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण रक्तदाते 115 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य निभावले आणि संस्थेस मोलाचे सहकार्य केले. या रक्तदात्यांचे संस्थे कडुन प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मंडळाने एम.जी.एम हॉस्पिटल, सर्वं रक्तदाते आणि डॉक्टर, नर्स, आदींचे यांचे आभार मानले.
लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, आदी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात, या स्पर्धा आयोजित करण्यामागे लहान मुलांसह तरूणाईच्या कलागुणांना वाव देणे एवढाच उद्देश असतो, दरवर्षी नित्यनियमाने देवीच्या भव्य अश्या महाप्रसादाचे आयोजन दसर्याच्या दुसर्या दिवशी मंदिराच्या सभामंडपात केले जाते.
आजूबाजूच्या परिसरातील अंदाजे दहा हजारांहून अधिक भक्तजण या महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यासाठी जय तुळजाभवानी सामाजिक संस्था मंडळाचे वरिष्ठ सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सभासद खुपच मेहनत घेतात अशी माहिती मंडळाच्या सर्व सदस्यांनी दिली. नऊ दिवस विनातक्रार आपापली नोकरी - धंदा सांभाळून ही सर्व मंडळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. सेक्टर 1 मधील रहिवाशी महिला मंडळाची ही साथ लाभत आहे.
महिलांची मोठी गर्दी
नऊ दिवस येथे जय तुळजाभवानी माता सामाजिक संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवसाला पावणार्या देवीच्या लौकिकामुळे भाविकांची खण - नारळ, साडी - चोळीने देवीची ओटी भरण्यासाठी नऊ दिवस गर्दी उसळते, नवरात्रातीत येथे आजूबाजूच्या भजन मंडळांकडून देवीचा जागर केला जातो. मंडळाची धुरा मंडळातील सर्वच सभासद समर्थपणे पेलत आहेत.