

पनवेल ः कळंबोली सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि परिसरातील रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी उड्डाणपूल व रस्त्याचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पासाठी 690 हून अधिक झाडांचे स्थलांतर करण्यात येणार. पनवेल म.न.पाचे उपआयुक्त यांनी याबाबत सार्वजनिक सूचना जारी केली असून, नागरिकांना आपल्या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला. हरकती व सूचना संबंधित कागदपत्रांसह झाड प्राधिकरण विभाग व बाग विभागाकडे सादर करता येतील.
कामाचा ठेका ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंपनीला देण्यात येणार असून, हरकती नसल्यास परवानगी दिली जाईल. उंबाड, नारळ, पिंपळ, गुलमोहर यांसह स्थलांतरित केली जाणार. शिलफाटा ते स्टील मार्केट यार्ड या मार्गावरील 27 झाडे हलवली जातील. कळंबोली सर्कलचा विस्तार हा परिसरातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
सध्या कळंबोली सर्कल हा मुंबई-गोवा महामार्ग, पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, जेएनपीटीकडे जाणारे रस्ते आणि नवी मुंबईतील अंतर्गत वाहतूक यांचा मुख्य संगमबिंदू आहे. त्यामुळे येथे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांना प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. उड्डाणपूल आणि रस्त्याच्या विस्तारामुळे ही कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
परिसरातील नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पासंदर्भात हरकती, सूचना नोंदवण्याची संधी साधावी, असे आवाहन म.न.पाच्या झाड प्राधिकरण विभागाने केले आहे. पर्यावरण संतुलन राखत विकासाचे काम करण्यावर भर देण्यात येणार असून, स्थलांतरित झाडांची देखभालही ठेकेदाराला करावी लागणार आहे.
झाडांच्या स्थलांतरासाठी चार ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यात ‘डी’ पॉईंट जेएनपीए ते एमजीएम हॉस्पिटल परिसरातील 274 झाडे, मॅकडोनाल्ड्स ते वाहतूक पोलिस ठाणे या दरम्यानच्या 200 झाडांचा समावेश आहे. तसेच स्टील मार्केट यार्डच्या रस्त्यालगत पुणे (एक्सप्रेसवे) बाजूकडून ‘डी’ पॉईंट जेएनपीए दिशेने असलेल्या 189 झाडांचे स्थलांतर होणार आहे.