

नेरळ : आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची दखल घेत आमदार महेंद्र थोरवे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, तसेच तालुक्यातील आदिवासी समाज संघटना यांच्या पुढाकाराने मंगळवारी (22 जुलै) कळंब येथील काही वर्षापासून बंद पडलेली शासकीय आश्रमशाळा पुन्हा सुरु करण्यात आली.शाळा सुरु होताच गेली अनेक वर्षे बंद पडलेल्या घंटेचा घणघणाट परिसरात घुमला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या कार्यक्षेत्रातील कळंब आश्रमशाळा पटसंख्या अभावी बंद करण्यात आली होती. बंद केलेली आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांच्या पसंतीनुसार व भौतिक सोयी सुविधा असलेल्या जवळच्या आश्रम शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला होता तसेच या आश्रम शाळेमध्ये शिकत असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अन्य ठिकाणी पाठवण्यात आले होते. सध्या स्थितीत रायगड जिल्ह्यात आदिवासी जमातीची कातकरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या ठिकाणी शासकीय आश्रम शाळा सुरू करण्याबाबत मागणी होत असल्याने, या ठिकाणी सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आश्रम शाळा सुरू करण्यात आली आहे.
शासकीय आश्रम शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे, तालुक्यातील आदिवासी समाज संघटना यांच्याकडून वारंवार मागणी केली जात होती तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून देखील या ठिकाणी शाळेची आवश्यकता असल्याने कळवण्यात आलेले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत कळंब तालुका कर्जत या ठिकाणाची बंद करण्यात आलेले प्राथमिक इयत्ता पहिली ते सातवी शासकीय आश्रमशाळा सन 2020- 26 शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आले आहे.
कळंब येथील शासकीय आश्रम शाळा तात्पुरती स्वरूपात कशेळे येतील भाडेतत्त्वावर पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेची वारंवार कळंब येथील बंद केलेली आश्रम शाळा चालू करण्याची मागणी होती. ती आश्रम शाळा चालू करण्यात आली असून मा. आत्माराम धाबे प्रकल्पाधिकारी पेण, व आमदार महेंद्र थोरवे यांचे मनपूर्वक आभार. व कळंब आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा.
परशुराम दरवडा, अध्यक्ष आदिवासी समाज
कर्जत तालुका ग्रामीण भाग असल्याने येथील विद्यार्थी संख्या जास्त आहे.कळंब शाळेसाठी लोक प्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे, तसेच स्थानिक आदिवासी समाज संघटना यांनी वारंवार प्रकल्प पेण कार्यालयात पत्र व्यवहार करून त्यांची मागणी तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून देखील या ठिकाणी शाळेची आवश्यकता असल्याने मान्यता देण्यात आली आहे.
आत्माराम धाबे, प्रकल्प अधिकारी पेण