

नेरळ : नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुलांकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन, शारीरिक संबंधाचे व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात या दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने कायद्यातील विधीसंघर्षित (गुन्हा केल्याचा आरोप असणारा अल्पवयीन) या संज्ञेनुसार दोन्ही मुलांना नेरळ पोलीसांनी ताब्यात घेऊन बालन्यायमंडळांच्या आदेशानुसार निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.
नेरळ परिसरातील असलेल्या भागातील दोन अल्पवयीन बालकांनी इंस्टाग्राम या सोशल अकाउंटवरून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुली सोबत मैत्री करून, तिला एका निर्जल ठिकाणी असलेल्या पडिक बंगल्यात बोलावून तिच्या सोबत जबरदस्तीने अतिप्रसंग करत, केलेल्या शारीरिक संबंधाचे चित्रिकरण केले. त्यानंतर तू सदर प्रकार हा कुणाला सांगितल्यास ते चित्रिकरण हे सोशल मिडियावर व्हायरल करू अशी धमकी देत या धमकीचा वारंवार वापर करून त्या पीडित मुलीचे शोषण या दोन अल्पवयीन बालकांकडून करण्यात आले. हा प्रकार जून ते 5 जुलै 2025 या कालावधीमध्ये घडला.
वारंवार होणार्या शोषणाविरोधात पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. ही बाब उघड होताच पीडित मुलीच्या घरच्यांनी थेट नेरळ पोलीस ठाणे गाठत नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना सर्व घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर अल्पवयीन दोन बालकांपैकी झोपेत असलेल्या एकाला प्रेमाने बोलावून ताब्यात घेऊन तर दुसर्याचाही शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेत दोघांची चौकशी केली.
नेरळ पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीनुसार पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर दोनही विधीसंघषित बालकांची चौकशी ही अतिसंवेदनशील असल्याने, मानसोपचारतज्ज्ञांची मदत देखील घेतली जात आहे. या बालकांना बालन्यायमंडळ यांचे आदेशानुसार निरिक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. तर पुढील तपास हा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अधिकारी प्राची पांगे या करीत आहेत.
पालकांनी आपल्या लहान मुलांना मोबाईल फोनपासून जेवढे दूर ठेवला येईल, तेवढा प्रयत्न करण्याचे आवश्यक आहे. नाहीतर भविष्यात आपल्या पाल्याकडूनही अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जास्तीत जास्त आपल्या पाल्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे.
शिवाजी ढवळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी