

मुरुड जंजिरा : पावसाचा जोर कमी होऊन मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी 15 ऑगस्टपासून सुरू होणे आवश्यक होते. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यात किल्ल्यात वाढलेली झाडी-झुडपे काढण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप किल्ला सुरू झालेला नाही. अजून एक महिनाभर तरी किल्ल्यात जाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. यामुळे पर्यटक आणि बोट व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.
मुरुडचा जंजिरा किल्ला पावसाळ्याची 3 महिने समुद्र खवळल्याने व वादळी वार्यामुळे पर्यटकांसाठी 25 मेपासूनबंद केला जातो. साधारण एक ऑगस्टला मासेमारी बोटी सुरु होतात. तसेच जंजिरा किल्ल्यात जाणार्या बोटी 15 ऑगस्टपर्यंत सुरु होणे अपेक्षित आहे.
जर 15 ऑगस्तपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी खुला करायचा असेल तर पुरातत्व खात्याने 15 दिवसअगोदर किल्ला सफाईचे काम सुरु करणे अपेक्षित आहे परंतु तसे होत नाही. दरवर्षी निधी व कामाला मजूर मिळत नाही, ही कारणे देऊन पुरातत्व खात्याचे अधिकारी कामाला सुरुवात करत नाही. पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग येलीकर म्हणाले की, 25 सप्टेंबरपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी सुरु होईल. त्यामुळे पर्यटक खूप नाराज आहेत.
बोट मालक चार महिने काम नसल्याने आर्थिक अडचणीत आहेत. जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यासाठी उशीर होतो, याचा जाब कोणीच विचारत नाही. जंजिरा किल्ल्यासाठी 93 कोटी खर्च करून पर्यटकांसाठी खास जेटी बांधण्यात आली आहे. जेटीचे काम पूर्ण झाले आहे, या हंगामात किल्ल्यात पर्यटक नवीन जेटी वरून सुरक्षित जाणार आहेत, परंतु किल्ल्यातील झाडे कटाई व स्वच्छता न झाल्याने नवीन जेटीचा वापर होत नसून पर्यटक नाराज आहेत. मुरुड जंजिरा येथील आर्थिक विकास पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे, त्यासाठी जंजिरा किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. जंजिरा किल्ल्याची समुद्राच्या लाटांनी अनेक बुरुजाला मोठी भगदाडे पडलीत.
आता या पावसात तलावासमोरील दरवाजा पडला आहे, अशांची दुरुस्तीची मागणी आम्ही नेहमीच करतो परंतु गर्ली 15 वर्षात एकदाही किल्ल्याचे बुरुज दुरुस्तीला निधी आला नाही असे अधिकरी सांगतात. मग किल्ल्यात प्रवेश तिकीटामधून मिळणारे पैसे जातात कुठे? ते पैसे किल्ला दुरुस्तीसाठी वापरावे, अशी मागणी होत आहे.
जंजिरा किल्ल्यासाठी प्रशस्त जेटी लवकरच सुरु होणार पण कधी? जेटीवर सावलीसाठी पत्रा शेड असणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे पर्यटक किल्ला पाहण्यासाठी सकाळी 7 वाजता जेटीवर हजर राहतात, पण पुरातत्व खात्याचा कर्मचारी वर्ग साडेनऊ वाजता येतो, त्यानंतर तिकीट मिळणार आणि किल्ल्यात जाणार. जर तिकीट देणारा कर्मचारी सकाळी 8 वाजता हजर झाला तर पर्यटकांची गर्दी कमी होईल व थंडवातावरणात पर्यटक किल्ला पाहतील.