खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
खाडीपट्टयात सद्या थंडीने कहर गाठला असून मोठया प्रमाणात थंडीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळ, संध्याकाळ नागरिक गरमगरम चहा, उबदार कपडे तसेच शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करताना पाहायला मिळत आहेत. मात्र वाढलेल्या थंडीमुळे आंबा कलमांना आणि कडधान्य शेतीसाठी उपयुक्त ठरेल असे शेतकर्यांनी सांगितले.
‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा’ अशी म्हणण्याची वेळ आता खाडीपट्टयातील जनतेवर आली असल्याचे पाहायला मिळत असून खाडीतून येणारे थंडगार वारे त्यापासून मोठया प्रमाणात येथे थंडी वाढली असल्याने बालबच्चे कंपनीसह वयोवृध्द शेकोटी बरोबरच उबदार कपडयाव्दारे थंडीपासून बचाव करित असताना पाहायला मिळत आहेत. मात्र थंडी खूप पडत असली तरी मॉर्निंग वॉकला जाणार्यांची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे.दसरा संपता संपता परतीच्या पावसाने गडगडाट करुन भात शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान पोहचले होते. त्यातुन कसेबसे उरलेसुरले पीक काढण्यांमध्ये शेतकर्यांची उडालेली तारांबळ पाहायला मिळत होती, मात्र खचून न जाता जे काही पिक हाताशी आले त्यातुन समाधान मानुन शेतकरी राजा पुन्हा आपल्या शेतीकडे वळला असल्याचे पाहायला मिळत आहे. वातावरणात बराचसा बदल झालेला जाणवत हुडहुडी भरणारी सद्या ग्रामीण भागामध्ये थंडी जाणवत असून हि गुलाबी थंडी कित्येकांनी हवीहवीशी वाटत असून तर वयोवृध्दांना मात्र थंडीचा त्रास होत असल्याचे काही वयोवृध्दांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. तर दुसरीकडे दुबार शेतीमधील कडधान्याच्या शेतीसाठी आणि आंबा बागायतीसाठी ही थंडी नक्कीच लाभदायक ठरेल असे शेतकरर्यांनी बोलताना सांगितले.
सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉकला जाणार्या जेष्ठांपासून ते तरूणांपर्यंत थंडीने हुडहुडी भरलेली पाहायला मिळत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून खाडीपट्टयातील सर्वच ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचे परिणाम झालेले दिसून येत असले, तरी शेतकर्यांना सकाळी पहाटे आपल्या शेतात जावून भातमळणीच्या कामांबरोबर वाल, पावटा, मुग कडधान्यांच्या बियान्यांच्या पेरणीची कामे देखील करावी लागत आहेत, तर दुध विक्रेता यांनाही आपली दैनंदिन कामे थंडीकडे दुर्लक्ष करून पहाटे करावीच लागत आहेत.
थंडीमूळे सगळीकडे धुक्याने माळ रान दिसेनासा झाला असून रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहन चालकांना धुक्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वेळेस समोरून येणारे वाहने धुक्यामुळे दिसत नसल्यामुळे वाहन ताब्यात ठेवताना मोठी दमछाक होते असे देखील पाहायला मिळत आहे.