

खोपोली शहर (रायगड) : दिलिप पवार
19 जुलै 2023 रोजी खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला होता. पैकी 57 जणांचे मृतदेह अद्याप सापडले नसुन मातीत गाडले गेले आहेत. दरडग्रस्तांना शासनाने 43 टुमदार घरं बांधून, पाणी, रस्ता , विज दिली. मात्र रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली असतांनाच चौक ग्रामपंचायतने मात्र 43 घर मालकांच्या डोक्यावर आभाळा एवढी घरपट्टी लादली असुन या आर्थिक ओझ्याने दरडग्रस्त पुन्हा अडचणीत आले असल्याने तुमच्या महाला पेक्षा आमची झोपडी बरी होती असं म्हणत सध्याची घर बंद करून पुन्हा जुन्या इर्शालवाडीत राहण्यास जाण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.
इथे विज बिल हजाराच्या घरात जात आहे. सिलेंडरसाठी महीना हजार रुपये, कडधान्य, तांदूळ, नाचणी साठी 5 हजार, प्रवासासाठी खर्च अशा ओझ्याखाली दबला जात आहे. नवीन घरांसाठी 5 हजार रुपये घरपट्टी लादली आहे. ती कशी भरायची, रोजगार नाही, सर्वच विकतचे आणावें लागत असल्याने आर्थिक घडी पुर्ण विस्कटली आहे.
जुन्या इर्शालवाडीत ना लाईट बिल, जंगलातून जेवणं शिजवण्यासाठी सरपण मिळत , ना घरपट्टी, शेत जमिनीतून भात, दळी वरकस मधून नाचणी वरी मिळत तर मासेमारी व खेकडा चिंबोरी व परसबागेतून भाजीपाला मिळत असे, दुभदुभता साठी गाई, अशा आंनदी जीवनात नियतीने घात केला. संसाराची राखरांगोळी झाली अन जीवनाची परवड सुरू झाली मात्र दुःखाचा डोंगर सारुन पुन्हा नव्याने संसार ऊभा केला जात असताना जीवनाची दशा थांबता थांबत नाही. पक्क्या घरातील खर्च केला भरुन जीव मेटाकुटीस आला आहे शासनाने पक्क्या घरात आणले मात्र आमची झोपडीच घरटंच बर, पावसाने उघाड घेताच जुन्या इर्शालवाडीचा रस्ता धरण्याच्या बेतात दरडग्रस्त ग्रामस्थ आहेत. दरडी खाली कुणाचे आई वडील तर कुणाचे भाऊ बहीण आजोबा आजी मावशी काका काकू दरडी खाली दबले गेले.
नियतीने घात केला. एकाकी जीवनात नव्याने सारीपाट खेळ मांडला दरडग्रस्तांना उदरनिर्वाह, नुकसान भरपाईच्या आर्थिक मदतीवर करावा लागत आहे. ती पुंजी संपली तर पुढे काय ? अशा चिंतेत दरडग्रस्त दिवस ढकलत आहेत. तुमच्या राजमहाला पेक्षा जंगलातील झोपडीच बरी, त्या ठिकाणी जंगली रानमेवा, मासे, खेकडा, चिंबोर्यांवर जीवन जगता तरी येते. आम्हाला आमची झोपडी प्यारी असे दरड ग्रस्तांचे म्हणनं आहे.
याबाबत चौक ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गणेश मोरे यांना विचारणा केली असता ग्रामपंचायत कर नियमानुसार लावले असल्याचे सांगितले तर सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी सांगितले की दंरडग्रस्तांना लावलेली घरपट्टी खुपचं जास्त आहे. ग्रामपंचायत सभेत याबाबत विचारणा करण्यात येईल तसेच नानीवली व इर्शालवाडी या गावांसह मोरबे धरण बाधीत गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी अशी मागणी केली जात आहे.