

उरण : जागतिक वारसा म्हणून गणल्या गेलेल्या उरण तालुक्यातील घारापुरी लेणी नेहमी परदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मुंबई पासून साधारण ११ किमी. तर मोरा आणि जेएनपीटी पासून हाकेच्या अंतरावर ही सुंदर लेणी आहेत. अखंड काळ्या पाषाणात कोरलेली लेणी ही सहाव्या शतकातील आहे. शंकराची अनेक रूपे या अदभुत लेण्यांतून मोठ्या खुबीने साकारलेली आहेत. सभोवताली निळाशार समुद्र आणि निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कुशीत असलेल्या या “वर्ल्ड हेरिटेज” लेण्या निश्चितच पहाण्यासारख्या आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला लेण्या आढळून येतात मात्र इतर ठिकाणच्या असलेल्या लेण्यांपेक्षा घारापूरी (एलिफंटा) येथील शैव लेण्या आगळ्या-वेगळ्या आहेत. या लेण्यांमध्ये शंकराची सकल आणि निष्कल रूपे साकारली आहेत. गाभाऱ्याच्या मंडपात प्रचंड मोठ्या आकारातील शिवलिंग आहे. या गाभाऱ्याला चारही दिशेने जाण्यासाठी प्रवेशद्वारे आहेत. अशा प्रकारच्या शैव लेण्या फक्त घारापुरीतच आपल्याला पहायला मिळतात.सम्राट चंद्रगुप्त (इ.स.३३५ ते ३३६) आणि त्याचा नातू कुमारगुप्त (इ.स.४१४ ते ४५४) तसेच नृपती राजा कृष्णराज यांच्या काळातील शिसा आणि तांब्याची नाणी येथे सापडली असल्याने तसेच कलचुरी घराण्याने बांधलेल्या शिवमंदिरांचे अवशेष घारापूरीत सापडत असल्याने ही लेणी तेव्हापासून कोरण्यास सुरूवात झाली असल्याचे बोलले जाते.
सागरी व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या घारापूरी बेटावर ताबा मिळविण्यासाठी अनेक साम्राज्यांची चुरस लागलेली असायची. त्यामुळेच या बेटाला “पश्चिम सागराची लक्ष्मी” असे म्हटले जात असल्याची इतिहासात नोंद सापडते. या बेटावर शिवछत्रपती राजांच्या काळात मराठ्यांची सत्ता असल्याचे देखील इतिहासात पुरावे सापडतात. इ.स.१५३४ पासून या बेटावर पोर्तुगिजांचा अंमल होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या तावडीतून हे बेट ताब्यात घेतले होते. १७७४ पर्यंत तेथे मराठ्यांची सत्ता होती. मात्र, १७७४ साली ते ब्रिटीश राजवटीच्या अधिपत्त्याखाली गेले.
घारापुरी बेटावरील ही लेणी पहाण्यासाठी जाताना उत्तरेकडून प्रवेश करताना पहिल्यांदा आपल्याला पहायला मिळते ती योगेश्वर शिवाची (लवलिश) मुर्ती. या शिल्पात लहान-मोठ्या प्रतिमा कोरल्या असून मध्यभागी शिवशंकर पदमासनात बसलेले दिसतात. डोक्याच्या भोवती प्रभावलय आहे. आजूबाजूला हंसारूढ ब्रम्हा, गरूडारूढ विष्णू, अश्वारूढ सुर्य, गजरूढ इंद्र, अमृत कुंभ धारी चंद्र आहेत. त्याच्या बाजूलाच दुसरे शिल्प रावणाचे कैलासोतोलन कोरलेले आहे. कुबेराचा पराभव करून रावण ज्यावेळेस कैलासातून जात असताना वाटेतच त्याचा रथ अडला. त्यानंतर रावण शिव शंकरांना भेटण्यासाठी जातो मात्र शिव-पार्वती कैलास प्रर्वतावर असल्याने भेट मिळणे अशक्य झाल्याने रावणाने कैलास पर्वतच गदागदा हलवून उखडून टाकण्याच्या प्रयत्नात असताना क्रोधीत शंकराने पायाच्या अंगठ्यात रावणाला दाबून ठेवले असल्याचे शिल्प येथे कोरलेले आहे. तिसरे शिल्प आपल्याला पहायला मिळते ते शिव पार्वती सारीपाट खेळत असल्याचे. मंडपाच्या दक्षिणेच्या भिंतीत तीन शिल्पे कोरलेली दिसतात. त्यापैकी पहिले अर्धनारिश्वर शिवाची सव्वा पाच मिटर उंचीची अतिभव्य मुर्ती, या शिल्पात उजवे अंग शिवाचे तर डावे अंग पार्वतीचे आहे. या लेण्यांचे प्रमुख आकर्षण म्हणजे अतिभव्य त्रिमुर्ती होय. या मुर्तीला महेश मुर्ती किंवा सदाशिव मुर्ती देखील म्हटले जाते. अभूतपुर्व आणि अद्वितीय अशी ही शिव प्रतिमा जग भरातील पर्यटकांना आणि इतिहास कारांना नेहमी भूरळ घालत असते. ब्रम्हा, विष्णू आणि महेश ही शिवाची तीन रूपे या मुर्तीत साकारली आहेत.
या त्रिमुर्तीच्या डाव्या बाजूला गंगावतरण शिल्प आहे. शंकराने भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीवर गंगा आणली, हा प्रसंग येथे कोरला आहे. पाच मिटर उंच भव्य कोरीव शिल्प येथे साकारलेले आहे. त्याच्या बाजूलाच शिव पार्वती विवाह सोहळा (कल्याणसुदर मुर्ती) प्रसंग दाखवणारे शिल्प आहे. येथेच अंधकासुरू-वधमुर्तीचे शिल्प आहे. पार्वतीला वश करण्यासाठी आतूर झालेल्या अंधकासूराचे शिवशंकराबरोबरचे युद्ध या शिल्पात रेखाटले आहे. लेण्यांच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला 3 मीटर 750 सेंटीमिटर उंचीचे आणि चार मिटर रूंदीचे नटराज शिल्प आहे. तांडव करत असताना शिवाचे मनोहारी रूप येथे कोरलेले आहे. या लेण्या पुर्वाभीमुख आहेत. प्राचीन भव्य शिवलिंग, डोंगर माथ्यावरील निसर्गरम्य सिता गुंफा देखिल पाहण्यासारखी आहे. डोंगर माथ्यावर आजही सुस्थित असलेल्या दोन भव्य तोफा देखिल इतिहासाची साक्ष देतात. अशा या जागतिक किर्तीच्या घारापूरी (एलिफंटा) लेणी नेहमीच जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत. काळ्या पाषाणात सहाव्या शतकातील अतिप्राचीन कोरलेल्या या लेण्यांमुळे घारापुरीला “वर्ल्ड हेरिटेज” दर्जा लाभला आहे. अत्यंत निसर्गसंपन्न असलेल्या आणि सर्व बाजूने समुद्राने वेढलेले घारापूरी बेट हे पर्यटनासाठी एक सुंदर स्थळ आहे.