

रायगड : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये भारतीय रेल्वेने ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ या संकल्पनेसह आणि प्रवाशांना अधिकाधिक स्वच्छ प्रवासाचा अनुभव मिळणे सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यापक उपक्रमांसह सातत्याने प्रमुख सहभाग नोंदवला आहे.
पंधरवडा कालावधीत, भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या गटांनी वृक्षारोपण मोहीम, स्वच्छ संवाद, स्वच्छ रेलगाडी, स्वच्छ स्टेशन, स्वच्छ परिसर, स्वच्छ आहार, स्वच्छ प्रसाधन इत्यादी दैनंदिन योजना किंवा उपक्रम हाती घेतले. या वर्षी रेल्वे मार्गावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. स्थानकालगतचे भाग आणि शहरी किंवा निमशहरी भागात असलेल्या रेल्वे मार्गांच्या परिसराची स्वच्छता, नाले आणि शौचालयांची स्वच्छता, रेल्वे वसाहतींची स्वच्छता, रेल्वे इमारती आणि आस्थापना यांच्या स्वच्छतेवरही भर देण्यात आला.
स्वच्छता पंधरवडा 2024 दरम्यान, भारतीय रेल्वेने एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंधरवडा कालावधीत 7285 रेल्वे स्थानके, 2754 रेल्वे गाड्या आणि 18331 कार्यालये स्वच्छ करण्यात आली. 45.20 कोटी चौरस मीटर क्षेत्राची स्वच्छता करण्यात आली. एकूण 20,182 किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग स्वच्छ करण्यात आले. 4 लाख 65 हजार 723 व्यक्तींनी स्वच्छता आवाहन किंवा श्रमदान उपक्रमात भाग घेतला. मोहिमेदरम्यान 1,17,56,611 मीटर नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. प्रवाशांच्या जनजागृतीसाठी 821 ठिकाणी पथनाट्ये आयोजित करण्यात आली होती.
भारतीय रेल्वेने 2259 कचरा विरोधी मोहीम राबविल्या ज्यात 12,609 व्यक्तींना दंड करण्यात आला आणि 1,77,133 व्यक्तींचे रेल्वे परिसरात कचरा न टाकण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. या मोहिमेत 1,541 स्वच्छता जागृती कार्यशाळा- वेबिनार्स आयोजित केले गेले ज्यामध्ये 66,188 नागरिकांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेत 2,63,634 रोपे लावली गेली. रेल्वे कार्यशाळेत या पंधरवड्यात 5,400 टन भंगार गोळा झाले. सर्व मिळून या पंधरवड्यात 4,619 टन कचरा गोळा करण्यात आला. 710 टन प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्यात आला. 19,759 कचर्याचे डबे बसवण्यात आले.
स्वच्छतेबद्दलच्या पाठपुराव्यांतर्गत प्रवाशांकडून 50,276 एसएमएस गोळा झाले. 2,597 ठिकाणी स्वच्छ आहार मोहिमा राबवल्या गेल्या व 6960 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स स्वच्छ करण्यात आले. त्याचप्रमाणे 4,478 ठिकाणी स्वच्छ नीर मोहीम राबवली गेली व 17,579 पाणी वितरण केंद्रे स्वच्छ करण्यात आली. ‘कचर्यातून कला’ चे सेल्फी पॉईंट्स 452 स्थानकांवर उभारण्यात आले.
सर्व रेल्वे कर्मचार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. स्वच्छता पंधरवड्याच्या बोधचिन्हासहित दर दिवशीच्या कार्यक्रमांची वेळापत्रके रेल्वेच्या संकेतस्थळावर पोस्ट केली गेली. त्यामध्ये 2,100 कृतियोजना व 3,250 विविध प्रकारच्या स्वच्छता उपक्रमांचा समावेश होता. रेल्वेगाड्यांमधून व स्थानकांवर कचर्याच्या योग्य विल्हेवाटीसंदर्भात उद्घोषणा केल्या गेल्या. प्रवाशांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृतीसाठी ‘स्वच्छ रेल्वे , स्वच्छ भारत’ या घोषणेसहित प्रभात फेर्या काढल्या गेल्या, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्थांना तसेच शाळकरी मुलांना सोबत घेऊन रेल्वे स्थानकांवर पथनाट्ये करण्यात आली. नागरिकांनी रेल्वे स्थानकांच्या जवळ, रेल्वे ट्रॅक वर, यार्डात अथवा डेपोमध्ये शौचाला बसू नये यासाठी त्याठिकाणी स्वच्छताविषयक पोस्टर्स लावण्यात आली, रेल्वेच्या परिसरातील स्थानके, रेल्वेच्या निवासी वसाहती, प्रतीक्षा कक्ष, अतिथी कक्ष, विश्रांती गृहे, डॉर्मिटरीज, कँटीनस, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, या सर्वांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.स्वच्छता पंधरवडा मोहिमेला सुरुवात झाल्यापासून दरवर्षी भारतीय रेल्वेतर्फे हा पंधरवडा राबवला जातो. यावर्षी भारतीय रेल्वेने हा पंधरवडा 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवला.
स्वच्छतेबद्दलच्या पाठपुराव्यांतर्गत प्रवाशांकडून 50,276 एसएमएस गोळा झाले. 2,597 ठिकाणी स्वच्छ आहार मोहिमा राबवल्या गेल्या व 6960 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स स्वच्छ करण्यात आले.