

पनवेल : श्रावण महिना सुरु होताच सणांचा माहोल बाजारात तयार होतो- नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारख्या सणांमध्ये विविध पूजनसामुग्रीची खरेदी वाढते. मात्र याच पार्श्वभूमीवर पनवेलच्या बाजारपेठेत मोरपिसांची मोठ्या प्रमाणावर खुलेआम विक्री सुरू आहे, जी कायद्याने पूर्णतः प्रतिबंधित आहे.
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून त्याची एकही अंगभूत वस्तू विकणे, खरेदी करणे, साठवून ठेवणे वा वापरणे वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 नुसार गुन्हा आहे. तरीही अनेक दुकानांमध्ये, फुटपाथवर आणि धार्मिक साहित्य विक्रेत्यांकडे मोरपीसे सर्रासपणे विकली जात आहेत.आपण सण साजरे करताना धर्माचं पालन करतो, पण यामध्ये राष्ट्रीय पक्ष्याची हानी केली जाते हे कुठल्या धर्मात बसतं? - असं संतप्त मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
पनवेलसारख्या शहरात खुलेआम अशा बेकायदेशीर विक्रीचा सुळसुळाट असणं दुर्दैवी आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून राष्ट्रीय पक्ष्याच्या संवर्धनासाठी पावले उचलावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
मोर हे संरक्षित पक्षी असून त्यांच्या शेपटीतील पिसं नैसर्गिकरीत्या झडल्यावर मिळणं फार दुर्मीळ असतं. मग ही हजारो पिसं बाजारात येतात तरी कुठून? याचा तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. बेकायदेशीर शिकार, जंगलातून चोरून संकलन किंवा तस्करीच्या माध्यमातून ही पिसं बाजारात पोहचत असावीत, असा संशय आहे.
नागरिक आणि प्रशासनासाठी जागृतीची गरज
वन विभागाने बाजारपेठेत छापे टाकावेत
मोरपीस विकणार्यांवर कठोर कारवाई करावी
नागरिकांनीही मोरपीस खरेदी न करण्याची शपथ घ्यावी