

पोलादपूर ः धनराज गोपाळ
गोवा राज्यातील महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत विदेशी मद्याचा साठा करुन तो महाराष्ट्र राज्यात विक्री करीता असलेल्या बाटल्यांमध्ये भरुन त्यावर बनावट बुचे व लेबल लावुन विक्री सुरु असलेल्या पोलादपूर तालुक्यांतील दिवील गावांतील बेकायदा व्यवसायावर छापा टाकून तब्बल 6 लाख 15 हजार 560 रुपये किमतीच्या बेकायदा मद्याचा साठा जप्त करुन दिवील गावांतील रुपेश सुरेश मोरे यांस गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. अन्य दोघा संशयीत आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहितीचे रायगड जिल्हा अधिक्षक रविकिरण कोले यांनी दिली आहे.
अवैध मद्याचा मोठा बेकायदा साठा करण्यात आला असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग मिळाली होती. त्या अनूशंगाने राज्य उत्पादन शुल्क आयूक्त डॉ. राजेश देशमुख,सह आयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उप आयुक्त प्रदिप पवार आणि रायगड जिल्हा अधिक्षक रविकिरण कोले यांच्या आदेशनुसार राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक अलिबाग क्र. 1चे निरिक्षक सतिश गावडे यांच्या नेतृत्वाखालील दुय्यम निरीक्षक प्रकाश दाते, रश्मीन समेळ,अपर्णा पोकळे, निमेश नाईक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कल्याणी ठाकुर, सुनिल घन, रंजित माकोडे, रिंकेश धुळे, रचना मोहिते, आशिष कांबळे व प्रसाद गिरी या पथकाने कारवाई केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यात विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, बुच्चे व लेबल असा असुन एकुण 750 मि.ली क्षमतेच्या 230 बाटल्या, 375 मि.ली क्षमतेच्या 10 बाटल्या व 180 मि.ली क्षमतेच्या 1604 बाटल्या, 1200 बनावट बुचे व लेबल 4129 यांचा समावेश आहे.महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास जिल्हा अधिक्षक कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गावडे हे करीत आहेत.
अवैध मद्यनिर्मित, वाहतुक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती वा तक्रार आल्यास टोल फ्री क्र.180023399999 व व्हाटसअॅप क्र. 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलादपूरात खळबळ
पोलादपूर तासुक्यांतील दिवील या गावांत बेकायदा मद्याचा हा उद्योग सुरु होता हे आज समोर आल्यावर नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर बेकायदा मद्य विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.