

जेएनपीए : एका बाजूला निसर्गाचा संहार करत डोंगर पोखरले जात असतानाच, आता उरण तालुक्यातील जासईमध्ये चक्क मानवी अवशेष सापडल्याने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. दादरपाडा बस स्थानकासमोरील बिअर शॉप जवळ टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात एक मानवी कवटी आढळून आली आहे. या भयानक प्रकारामुळे बेकायदेशीर माती उपशाच्या मागे एखादे मोठे गुन्हेगारी रॅकेट किंवा हत्याकांडाचे रहस्य दडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जासईतील बेकायदेशीर उत्खननाला गुन्हेगारीचे वळण लागले आहे. उरण तालुक्यात सध्या कायद्याचे नियम धाब्यावर बसवून माती खोदा आणि पैसे कमवा हा एकच अजेंडा राबवला जात आहे. स्थानिक माती माफियांनी जासई परिसरातील डोंगरांची अशी काही चाळण केली आहे की, आता या डोंगरांना खड्डा योजना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे.
निसर्गाचे आणि शेतजमिनींचे कंबरडे मोडून सुरू असलेल्या या व्यवसायातून माणुसकी पुरती गाडली गेली आहे. निसर्गाच्या या पोस्टमॉर्टमच्या बाजारात आता चक्क माणसांची हाडे आणि कवटी बाहेर येऊ लागल्याने परिसरात कमालीची घबराट पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भर वस्तीत आणि रस्त्याच्या कडेला मानवी शरीराचा भाग सापडूनही स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासन कमालीचे शांत आहे. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, अधिकारी मात्र कोणतीही हालचाल करायला तयार नाहीत.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जासई आणि परिसरातून दररोज रात्री अपरात्री आणि दिवसाढवळ्या हजारो डंपर माती चोरून नेले जाते. या अवैध वाहतुकीला राजाश्रय मिळण्यासाठी प्रति डंपर ‘प्रसाद’ वाटला जातो, असे स्थानिकांकडून सांगितले जाते. एवढा मोठा गैरवावर उघड सुरू असताना पोलीस, महसूलचे अधिकारी नेमके कोणाच्या आशीर्वादाने डोळे झाकून बसले आहेत असा थेट आरोप ग्रामस्थांकडून आता केला जात आहे.
सापडलेली कवटी नेमकी कुठून आली यावरून आता संशयाचे धोके घडत झाले आहेत. हा मातीचा भराव मुंबईतील एखाद्या जुन्या पुलाच्या डेब्रिज कामातून आणला आहे की स्थानिक डोंगरातून? आज कवटी सापडली उद्या मृतदेह सापडण्याची पण भीती व्यक्त होत आहे. हा प्रकार केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नसून गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याने पुढील पोलिसांनी तहसीलदार यांनी मूग गिळून गप्प न बसता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा आणि ती कवटी कोणाची आहे, याचा छडा लावावा अशी मागणी आता जनतेतून केली जात आहे.
गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याने पुढील पोलिसांनी तहसीलदार यांनी मूग गिळून गप्प न बसता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा आणि ती कवटी कोणाची आहे, याचा छडा लावावा अशी मागणी आता जनतेतून केली जात आहे.