Hot Water | उन्हेरेत गरम पाण्याच्या कुंडांवर पर्यटकांची गर्दी

निसर्गाचा अद्भूत चमत्कार ; विद्यार्थ्यांकडून कुंडांचा अभ्यास
Hot Water Pond
उन्हेरे गरमपाण्याचे कुंड म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे. Pudhari
Published on
Updated on

सुधागड | संतोष उतेकर

रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली पासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर असलेले उन्हेरे गरमपाण्याचे कुंड म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे. पृथ्वीच्या भूगर्भातून येणारे हे गंधक मिश्रित पाणी शरीरासाठी आरोग्यदायी देखील आहे. सध्या थंडीत या गरम व आरोग्यदायी पाण्याचा तालुक्यातील नागरिक, पर्यटक व सहलीला येणारे विद्यार्थी मनसोक्त आनंद घेतांना दिसत आहेत.

सर्व ऋतूमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना जणूकाही निसर्गाने उन्हेरे या गावी केली आहे. या गंधकमिश्रीत उष्णोदक पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार, सांधेदुखी आदी आजार बरे होण्यास लाभदायी ठरते. म्हणूनच स्नानाबरोबरच आरोग्य राखण्यासाठी सुद्धा या पाण्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे सर्व ऋतूमध्ये गरम राहणार्‍या पाण्याच्या कुंडात स्नानासाठी येथे देशभरातून तसेच परदेशातून देखील अनेक लोक येतात. हिवाळ्यात पर्यटकांबरोबरच शालेय सहली सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात येतात. सर्वचजण गरम पाण्याचा मनसोक्त आनंद घेतात. त्यामुळे उन्हेरे गरम पाण्याचे कुंड हे स्थळ सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी, स्थानिकांनी तसेच सहलींच्या विद्यार्थ्यांनी बहरलेले दिसत आहेत.

अशी आहेत कुंड

येथे एकूण तीन कुंड आहेत. त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे तर उर्वरित दोन कुंड गरम पाण्याचे आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड उघड्यावर आहेत. त्यांना दगडी बांधकाम केले आहे. या गरम पाण्याच्या कुंडला खाली सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. त्यामुळे कोणी बुडण्याचा धोका नाही. या दगडी कुंडातील पाणी जास्त गरम असते. तर दुसरे कुंड मोठे आहे. हे कुंड बंदिस्त असुन त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन भाग केले आहेत. या कुंडला खाली लाकडी फळ्या बसविण्यात आल्या असल्याने येथेही कोणी बुडण्याचा धोका नाही.

थकवा दूर

या गरम पाण्यात स्नान केल्यास ताजेतवाने वाटते. शरीरातील क्षीणपणा व थकवा नाहीसा होतो. त्यामुळे दिवसभर काम करून आलेले लोक, शेतात काम करून दमून थकून आलेले शेतकरी संध्याकाळी येथून स्नान केल्याशिवाय जात नाही. उन्हाळ्यात सुद्धा लोक येथे स्थान करतात. मात्र 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ या पाण्यात राहिल्यास चक्कर सुद्धा येते.

निसर्गरम्य वातावरण

कुंड परिसरात विठ्ठलाचे मंदिर आहे. सभोवताली वृक्षराजी आहे. कुंडांच्याच्या समोर काही अंतरावर अंबा नदी वाहते. पाठीमागून उन्हेरे धरणाचे पाणी वाहते. बाजूला शेती आहे. फार रहदारी नाही. असे निसर्गरम्य आल्हाददायक वातावरण येथे आहे.

इतर सोयी सुविधा

कुंड परिसरात जेवण, चहा पाण्यासाठी हॉटेल आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. येथे शेजारीच स्वच्छतागृह व स्नानगृह आहेत. वाहने उभी करण्यास पार्किंगची सुविधा आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथे एक सभागृह देखील बांधण्यात आले आहे. शिवाय ट्रस्टतर्फे सुविधा पुरविल्या जातात. स्वच्छता राखली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news