

रायगड : अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत रुग्णांना मोबाईलवरून केस पेपर नोंदणीची 'हायटेक' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी हीच ऑनलाईन प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकां अडचणीची ठरत आहेत. मोबाईलवर 'आभा' ॲप डाउनलोड करा, मोबाईल नंबरने रजिस्टर करा, क्यूआर कोड स्कॅन करा, टोकन मिळवा आणि नंतर पुन्हा रुग्णालयात जाऊन तेच टोकन दाखवून केस पेपर घ्या, एवढी क्लिष्ट प्रक्रिया रुग्णांसाठी 'सुविधा' नसून सरळसरळ त्रासदायक 'यंत्रणा' ठरत आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिलांचे हाल अधिकच वाढले आहेत. केस पेपर मिळवण्यासाठी आधी ऑनलाईन कसरत करा आणि नंतर पुन्हा रांगेत उभे राहा. डिजिटल सुविधा म्हणून दिलेली ही अडचण आम्हाला नको, असा सर्वसामान्यांचा सूर आहे. काही रुग्ण ऑनलाईन टोकन मिळविण्यासाठीच रुग्णालयाच्या आवारात तासंतास फिरत राहतात. मोबाईलमध्ये कमी नेटवर्क, ॲपचा उशीर, स्कॅनिंगमध्ये अडचणी यामुळे रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
ऑनलाईन सुविधा आणण्यामागील उद्देश रुग्णांना रांगेपासून मुक्त करणे हा होता, परंतु प्रत्यक्षात टोकन, स्कॅन, रजिस्ट्रेशन आणि पुन्हा रांग अशी 'दुहेरी' कसरत रुग्णांकडून करवून घेतली जात आहे. डिजिटल वळणाचे स्वागत असूनही ही प्रक्रिया तत्काळ सुलभ न केल्यास रुग्णांसाठी सुरू असलेली ही रोजची धावपळ आरोग्य व्यवस्थेवरील नाराजी अधिक वाढविण्याची शक्यता आहे.
सुविधा तर डिजिटल रांगा मात्र दुप्पट
जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या खिडक्यांची व्यवस्था असूनही नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे, डिजिटल प्रक्रियेने ही रांग कमी होईल अशी अपेक्षा होती, परंतु टोकन मिळविण्यासाठीच आता नवीन रांग तयार झाली आहे. रुग्णालयातील आभा कक्षात क्यूआर स्कॅन करण्यासाठी उसळणारी गर्दी पाहून अनेकजण संतापून म्हणत आहेत, जुनी पद्धत बरी होती.
प्रक्रिया सुधारू; आरोग्य विभागाचे आश्वासन
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी सांगितले, आभा हेल्थ मिशन अंतर्गत ऑनलाईन प्रक्रिया राबवली असून, कुठे विलंब होत असल्यास प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, मार्गदर्शनासाठी कर्मचारी नेमले आहेत.