

पाली (रायगड) : शरद निकुंभ
सुधागड तालुका हा पुरातन कालीन बुद्ध लेण्यांसाठी संबंध महाराष्ट्रात परिचित आहे. लेणी संवर्धक तसेच अनेक बौद्ध अनुयायी तथागत गौतम बुध्दांच्या कोरीव काम केलेल्या लेण्या बघण्यासाठी येत असतात. अशातच प्राचीन कालीन इतिहास संपन्न असलेल्या सुधागड तालुक्यात पुन्हा एकदा प्राचीन वारशाचे दर्शन घडले आहे.
तिवरे गावाजवळील बंद पडलेल्या अल्ट्रा कंपनीच्या परिसरात तथागत गौतम बुद्ध यांच्या प्राचीन मूर्तीचे तसेच अन्य काही शिल्पांचे अवशेष आढळून आले आहेत. या अनपेक्षित शोधाने संपूर्ण परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका स्थानिक इन्स्टाग्राम यूजरने या मूर्तीचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने हा तिवरेनजीक आढळली प्राचीनकालीन मूर्ती प्रकार प्रकाशात आला.
काही तासांतच ही पोस्ट व्हायरल झाली आणि परिसरातील बौद्ध अनुयायांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी अल्ट्रा कंपनीच्या परिसरात जमा झाली. घटनास्थळी एक प्राचीन धम्मचक्रसदृश चाक (जाता) आणि बुद्ध मूर्तीचे अवशेष स्पष्ट दिसत होते. या दगडी मूर्तीवरील कोरीव काम व मूर्तीची मुद्रा पाहता ती बौद्ध कालखंडातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी आलेल्या बौद्ध अनुयायांनी पंचशील ध्वज रोवून त्या जागेचा सन्मान राखला. त्यांनी परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, या ठिकाणी कोणत्याही प्रकारे विडंबन होऊ नये आणि या अवशेषांचे रक्षण व्हावे, अशी सामूहिक भावना त्यांनी व्यक्त केली.