

पनवेल : खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या एका बहुमजली इमारतीच्या बांधकामादरम्यान काल मोठी दुर्घटना घडली. यामध्ये रस्त्याचा काही भाग खचला तर फुटपाथ चक्क ढासळले, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी हा प्रकार धक्कादायक आहे.
विशेष म्हणजे संबंधित बांधकामास पनवेल महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेतलेलीच नाही, हे आता उघडकीस आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प अनधिकृत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पनवेल महानगरपालिकेने बजावलेल्या नोटीस मध्ये " इमारतीचे अनधिकृत " बांधकाम थांबवावे असा उल्लेख केला आहे.
या इमारतीचा प्रकल्प ‘नीलकंठ ग्रुप’ या बांधकाम व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणावर खोदकाम व अन्य बांधकामाचे काम सुरू होते. जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी ५० फूट हून अधिक खोल मोठ्या व्यासाचे खड्डे घेतले आहे. त्या वेळी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी करूनही, काहीच कारवाई झालेली नव्हती. मात्र सोमवारी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली त्यामध्ये रेल्वे स्थानकाच्या शेजारील रहदारी असलेला रस्त्याचा काही भाग खचला, तसेच फुटपाथचा मोठा भाग ढासळला तसेच बाजूला लावलेले मोठे पत्रे देखील पडले आहे, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या कालच्या दुर्घटनेनंतर पालिकेला जाग आली आणि संबंधित प्रकल्पाला नोटीस बजावून बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहे. पालिकेने बजावलेल्या या नोटीसी मध्ये " अनधिकृत विकास कार्य सुरू असल्याचा उल्लेख " करण्यात आला असून, आपल्यावर कारवाई का करू नये असा उल्लेख करण्यात आला आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी कोणतीही बांधकाम परवानगी किंवा विकास आराखड्याची मंजुरी घेण्यात आलेली नाही. याशिवाय नियमांनुसार आवश्यक असलेली फायर एनओसी, पर्यावरण मंजुरी, तसेच आरोग्य विभागाच्या शिफारसीसुद्धा या प्रकल्पास प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र तरीदेखील हे बांधकाम मोठ्या बेधडकपणे सुरू होते. आणि अवैधरीत्या खोदकाम केलेले दिसून येत आहे.
या प्रकल्पातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या इमारतीमधील घरांचे सुमारे ३० टक्के फ्लॅट्स विक्रीसाठी आधीच देण्यात आले आहेत. काही खरेदीदारांनी तर आगाऊ रकमा देखील भरल्या असल्याचे समजते. कोणतीही कायदेशीर मान्यता न घेताच घरांची विक्री करणे हा गंभीर फसवणुकीचा प्रकार मानला जातो. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे ठरू शकते. बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सध्या पालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित बांधकाम त्वरित थांबवण्याचा इशारा दिला आहे. तसेच ‘नीलकंठ ग्रुप’च्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपासात बांधकाम परवानग्यांविना सुरू करण्यात आलेल्या इतरही प्रकल्पांचा तपशील घेतला जाणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
स्थानिक नागरिकांत या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक नागरिकांनी विचारले आहे की, एक महिना उलटूनही हे अनधिकृत बांधकाम पालिकेच्या नजरेत कसे आले नाही? काहींनी यात राजकीय दबाव किंवा आडमुठेपणाचाही संशय व्यक्त केला आहे.
हे प्रकरण सध्या पनवेलमध्ये चर्चेचा विषय बनले असून, घर खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पैशांच्या गुंतवणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने आता तरी सजगतेने कारवाई करत या प्रकारांवर नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पनवेल महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम व्यवसायिकांनी राजरोस पद्धतीने बांधकाम सुरू केले आहे. परवानगी न घेता सुरू केलेल्या बांधकामामुळे काल अनेकांचे जीव वाचले आहेत. त्यामुळे अशा बांधकाम व्यवसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच निवेदन देखील आयुक्त स्थानिक पोलीस स्टेशन यांना दिले आहे. फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे.
गेल्या चार महिन्यापासून नीलकंठ ग्रुपच्या माध्यमातून आम्ही काम सुरू केलेले आहे. मात्र स्थानिक पनवेल महानगरपालिकेची आम्ही परवानगी घेतली नसल्याची माहिती बांधकाम व्यवसायिक नारायण शेठ यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना दिलेली आहे.
बांधकाम व्यवसायिकाला केवळ एलओसी देण्यात आली आहे : केशव शिंदे सहाय्यक संचालक नगररचनानीलकंठ ग्रुप ने सुरू केलेल्या बांधकामादरम्यान काल घडलेली घटना ही दुर्दैवी आहे पनवेल महानगरपालिकेकडून कोणतीही बांधकाम परवानगीने बांधकाम व्यवसायिकांनी घेतलेली नाही. पनवेल महानगरपालिकेने पर्यावरण परवानगी मिळावी यासाठी एलओसी त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांनी केलेले हे काम अनधिकृत असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितलेले आहे.