

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
मुरूडमध्ये प्रत्येकी 1 लाख असे 200 लोकांकडून 2 कोटी गोळा करून दहा कोटी देण्याचे आमिष दाखवून तीन आरोपींनी फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले असून मुरूड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. बँकेप्रमाणे डिपॉजिट म्हणून 1 लाख रुपये घेउन दर महिन्याला दहा टक्के व्याज देण्याचे आरोपीनी कबूल केले होते. मात्र काही महिने व्याज दिल्यानंतर व्याजही देण्याचे बंद केले आणि मुद्दलही नाही अशी स्थिती आल्यानंतर फसवणूक झालेल्या ठेवी देणाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील राहील सोंडे, सलमान दिवाण, सुफियान दिवाण या तिघानी मिळून कमी कमी एक लाख रुपये गुंतवल्यास 7 किंवा 10 टक्के व्याज प्रत्येक महिन्यास दिले जाईल असे अभिवचन देऊन स्थानिक लोकांकडून करोडो रुपयांच्या ठेवी गोळा करून बँकेप्रमाणे व्यवसाय सुरू केला होता.
या तिघांनी मिळून सन 2022-23 या दोन वर्षी व्यवसाय व्यवस्थित सुरू ठेवला. परंतु सन 2024 रोजी या तिघांनी लोकांना व्याज देणे बंद केले. तेव्हा लोक त्यांना विचारणा करू लागले व्याज का मिळत नाही त्यावेळी या तिघांनी व्यवसायात तोटा आल्याचे कारण सांगून व्याज देण्यास टाळाटाळ करू लागले. व्याज देत नसल्याने गुंतवणूकदार यांनी आपल्या ठेवी मागितल्या परंतु तदनंतर हे तिघेही गायब झाल्याने नांदगाव मजगाव व विहूर मधील नागरिकांना कळून चुकले कि आपली फसवणूक झाली आहे. सर्व लोक ठेवीदार एकत्र येऊन आपली फसवणूक झाल्याची लेखी तक्रार सर्वप्रथम महंमद तलवसकर व अन्य व्यक्तींनी मुरुड पोलीस ठाण्यात नोंदवली.
मुरुडचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी वेळीच दखल घेत विशेष तपास पथक तयार करून पनवेल येथून राहील सोंडे व सुफियान दिवाण याना अटक करून मुरुड पोलीस ठाण्यात आणले आहे. यातील फरार आरोपी सलमान दिवाण याचा शोध सुरु असून लवकरच त्यास अटक करण्यात यश मिळेल असा विश्वास मुरुड पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दोघांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे हे करीत आहेत.
तिसऱ्या आरोपीला लवकरच अटक होईल
या बाबत अधिक माहिती सांगताना पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले कि, स्थानिक लोकांच्या आतापर्यंत एक कोटी रुपयांच्या फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तिघांपैकी दोघांना अटक करण्यात यश प्राप्त झाले असून तिसरा आरोपी सुद्धा लवकरच अटक होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आणखीन तक्रारदार वाढून मुद्दल रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.