

रायगड ः वस्तू व सेवा कर आणि महसूल उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी मंत्री गटाची आज झालेली पहिली बैठक देशातील सर्व राज्यांच्या जीएसटी धोरणांना स्पष्ट दिशा देत केंद्र व राज्य यांच्यातील आर्थिक समन्वय साधण्यासाठी दिशादर्शक ठरेल हा मला विश्वास आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर आणि महसूल उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी मंत्री गटाची पहिली बैठक नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाली. या बैठकीत सहभागी होत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.त्या अनूशंगाने मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स-हॅन्डलवरुन ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राच्या वतीने मागील बैठकीत कर प्रणाली बाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले होते, आजच्या बैठकीत उर्वरित राज्यांपैकी काही राज्यांच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. यावेळी कर प्रणालीबाबत केंद्र शासन व राज्य शासनांमध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी एक सामाईक व्यासपीठ निर्माण करण्याची भूमिका आपण महाराष्ट्राच्या वतीने मांडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जीएसटी आणि महसूल उत्पन्नावर आधारित मंत्री गटाची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत राज्यनिहाय महसूल प्रवृत्ती, आर्थिक घटकांचा प्रभाव, करचोरी विरोधी उपाय आणि धोरणात्मक शिफारशींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ही बैठक सर्व राज्यांच्या जीएसटी धोरणांना स्पष्ट दिशा देत केंद्र व राज्य यांच्यातील आर्थिक समन्वय साधण्यासाठी दिशादर्शक ठरेल हा मला विश्वास आहे, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी अखेरीस म्हटले आहे.