

अलिबाग ःजिल्ह्यात दहिहंडी, गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात 287 सार्वजनिक तर 1 लाख 2 हजार 198 खाजगी गणपती आहेत.
उत्सवासाठी गावी परतणार्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्कता राखत वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. तर गणेशोत्सवाकडे वारकर्यांच्या दिंडी प्रमाणे बघा असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला , जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जि.प.सीईओ नेहा भोसले यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांचा जागता पहारा
गणेश भक्तांचा प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट, 10 सुविधा केंन्द्र, 10 क्रेन, 10 अॅम्ब्युलन्स, 7 उपविभागीय पोलिस अधिकारी, 12 पोलिस निरीक्षक, 43 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 276 पोलिस कर्मचारी व होमगार्ड 100 नेमण्यात आले आहेत.
यासह खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापुर ,माणगाव , लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी.,पोलादपुर या ठिकाणी सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंन्द्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष , आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल.
अवजड वाहनांवर बंदी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. यानुसार 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून 29 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत, 2 सप्टेंबर 2026 सकाळी 8 वाजेपासून ते 4 सप्टेंबर 2025 सकाळी 8 वाजेपर्यंत तसेच 6 सप्टेंबर 2025 सकाळी 8 वाजेपासून ते 8 सप्टेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांना वाहतूक करता येणार नाही.
सणासाठी मुंबई, ठाणे, पुण्यातून कोकणवासी आपल्या गावाकडे येत असतात. या दरम्यान गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पोलिस दलाने खबरदारी घेतली असून हा उत्सव भक्तीमय व शांततापुर्ण वातावरणात होणार आहे.
आँचल दलाल, जिल्हा पोलिस अधिक्षक
येणारा दहीहंडी सण उत्तम साजरा व्हावा यासाठी दहीहंडी सणा दिवशी महीला पोलिस, दामिनी पथक मंडळाबाहेर होणार्या गर्दीवर लक्ष ठेवून असणार आहेत. तसेच गणेशोत्सवाात महावितरण विभागाने विज खंडीत करू नये.
किशन जावळे, जिल्हाधिकारी