

महाड (रायगड) : महाडमधील नातेकर कुटुंबाने 75 वर्षांहून अधिक काळापासून तीन पिढ्यांनी एकत्र येऊन गणेशोत्सवाची परंपरा अखंड राखली आहे.
गणपती बाप्पाचे आगमन हे या कुटुंबासाठी फक्त धार्मिक विधी नसून नात्यांची उब, एकतेचा आनंद आणि संस्कारांचा वारसा जपण्याचा सोहळा आहे. वाढवडिलांपासून सुरू असलेल्या या परंपरेला ज्येष्ठ माऊली लक्ष्मी नारायण नातेकर कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, एकोप्यासाठी ही परंपरा नेटाने सुरू ठेवली आणि आजही ते श्रद्धा, संस्कार ७५ वर्षांनंतरही याच एकोप्याने भक्तीभावाने टिकून आहेत. विनायक, रमेश, सुभाष तर तिसऱ्या पिढीतील विश्वजीत, अजित, राजा, रंजीत, योगेश, समीर हे सर्वजण सणात उत्साहाने सहभागी होतात. नव्या पिढीतील पारस, दुर्वांक, गौरांग, शिव यांसारखी लहान मुलेही बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर असतात. हा आमच्यासाठी फक्त सण नाही, तर नात्यांना घट्ट करणारा धागा आहे. तीन पिढ्या एकत्र येऊन बाप्पाची सेवा करण्याचा आनंद वेगळाच असतो, असे तरुण सदस्य सांगतात वाडवडिलांनी सुरू केलेली ही परंपरा पुढे चालवणे ही आमची जबाबदारी असून हे संस्कार आमच्या पुढच्या पिढीला देणे हे आमचे कर्तव्य समजून आम्ही आजपर्यंत हे भक्तिभावाने करीत आलो आहोत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान देखील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संपूर्ण कुटुंबातील ३५ हून अधिक सदस्य गणेशोत्सवाच्या प्रत्येक उपक्रमात मनापासून सहभागी होतात आरती, पारंपरिक जेवण, सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळे एकत्र अनुभवतात. फक्त गणेशोत्सवच नाही, तर गणेशोत्सवासोबतच या कुटुंबात पिठोरी अमावस्या पूजन, श्रावणातील उत्सव आणि इतर सांस्कृतिक सणही एकत्र साजरे केले जातात मात्र, गणेशोत्सव हा एकोप्याचा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा मुख्य सण असल्याने या दिवसांची आतुरतेने वाट पाहिली जाते.