

अलिबाग ः अलिबाग नगरपरिषदेने गणेशोत्सवासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवली असली तरी, या नियमांमुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अलिबाग नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी शहरात लावलेल्या बॅनर नुसार ’इको-फ्रेंडली बाप्पा’ आणि साधेपणावर भर देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, अनेक गणेश मंडळांना आणि घरगुती भक्तांना हे नियम जाचक वाटत आहेत.त्यामुळे गणेशभक्त धरबंध झाल्याचे जाणवत आहे.
यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या आवाहनामुळे नेहमीचा जल्लोष आणि उत्साह कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट आणि घरगुती गणेशमूर्तींसाठी 2 फुटांची उंची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे भव्य मूर्तींची परंपरा खंडित होणार असून, अनेक मंडळांना त्यांच्या नेहमीच्या मूर्तीकारांकडून मूर्ती बनवून घेता येणार नाहीत.
एकंदरीत, अलिबाग नगरपरिषदेने शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलब्लजावणी करत ’इको-फ्रेंडली’ आणि ’साध्या’ गणेशोत्सवाचा संदेश दिला असला तरी, यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाऐवजी नाराजी आणि बंधनांची भावना अधिक दिसून येत आहे. या नियमांमुळे गणेशोत्सवाचे पारंपरिक स्वरूप हरवेल का, अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे.
शाडूच्या मातीच्या किंवा धातू/संगमरवराच्या मूर्ती वापरण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. पीओपी मूर्तींवर बंदी असल्यामुळे अनेकांना पर्यायी मूर्ती शोधण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाईल असे सांगण्यात आले असले तरी, पारंपरिक विसर्जन स्थळांचा वापर बंद झाल्याने भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणे हे अनेक गणेशभक्तांसाठी कमी समाधानकारक अनुभव ठरू शकते.
आरोग्य विषयक सवयींचा अवलंब करण्याचे आवाहन जाहिराती आणि कार्यक्रमांतून केले जाणार असले तरी, या कठोर नियमांमुळे उत्सव साजरा करण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा येत असल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत. पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली परंपरेवर आणि श्रद्धेवर अनावश्यक निर्बंध लादले जात असल्याची टीकाही होत आहे.
मंडळाची मूर्ती ही 1 ते दीड महिना आधी बुक होते. ही संकल्पना राबवायची होती तर प्रभारी मुख्याधिकारी ह्यांनी सर्व मंडळांना कल्पना द्यायला हवी होती किंवा मीटिंग आयोजित करायला हवी होती. घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणच्या मूर्ती ह्या जून पासूनच बुकिंग होते त्यामुळे यावर्षी तरी हे शक्य नाही आमच्या मंडळाचे हे 37 वे वर्ष असून आमची मूर्ती ही 8 फूट असते.
रविकिरण आंबेकर, आदर्श मित्रमंडळ, शितोळे आळी अलिबाग